राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना मुख्यमंत्री कार्यालयातून विमान प्रवासाची परवानगी न मिळाल्याने त्यांना विमानातून उतरून राजभवनात परतावे लागल्यावरून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. आरोप प्रत्यारोप झडत आहेत. यावर आता ठाकरे सरकारचे मंत्री बच्चू कडू यांनीदेखील मत व्यक्त केले आहे. (Bacchu kadu express on governor bhagat singh koshyari airplane cancel matter.)
बच्चू कडू आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना या वादावर छेडले असता त्यांनी राज्यात गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या राजकारणाकडे बोट दाखविले. भगतसिंग कोश्यारींची भूमिका राज्यपालासारखी नाहीय, ते एका पक्षाची भूमिका घेत आहेत. त्यांनी त्यांच्या पदाची गरीमा राखावी, अशी अपेक्षा व्यक्त करत विमान मिळाले नाही यामागे काहीतरी तांत्रिक कारण असावे, असे सांगितले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियोजित दौऱ्यानुसार आज उत्तराखंडसाठी रवाना होणार होते. पण सरकारी विमानात बसल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्या विमान प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचं कळालं. त्यामुळे त्यांना विमानातून खाली उतरावं लागलं आणि पुन्हा राजभवनात परतावं लागल्याची माहिती समोर आली.
भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आलं असता "मला या घटनेबाबत कोणतीही माहिती नाही. मी आता इथून मंत्रालयात जाणार आहे. तिथं गेल्यावर याबाबतची माहिती घेईन त्यानंतर बोलेन", असं अजित पवार म्हणाले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. "राज्याच्या राज्यपालांशी निगडीत घटनेवर राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून बोलत असताना संपूर्ण माहिती घेऊनच बोलणं योग्य आहे. ज्या घटनेबाबत मला कोणतीही माहिती अद्याप नाही. त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. मंत्रालयात गेल्यावर याबाबत माहिती घेईन", असं अजित पवार म्हणाले.
राज्यपालांसोबत नेमकं काय घडलं?उत्तराखंडमधील मसूरी येथे लालबहादुर शास्त्री अकादमीच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित राहणार होते, त्यासाठी राज्यपाल सरकारी विमानाने मुंबई विमानतळावरून रवाना होणार होते, तत्पूर्वी सरकारी विमान वापरण्यासाठी राजभवनाकडून रितसर सामान्य विभाग प्रशासनाला परवानगीसाठी कळवण्यात आलं होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ही परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांसह राजभवनाचे अधिकारी १५ मिनिटं विमानात बसून होते, तरीही परवानगी न मिळाल्याने अखेर राज्यपाल विमानातून उतरले, त्यानंतर राज्यपालांसाठी स्पाइस जेटचं व्यावसायिक विमानाची व्यवस्था करण्यात आली, १२.१५ मिनिटांनी त्यांचे विमान देहरादूनसाठी रवाना झालं, देहरादूनपर्यंत राज्यपाल विमानाने प्रवास करतील त्यापुढे मसूरीपर्यंत राज्यपाल वाहनाने जातील, आणि उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी माहिती लोकमत ऑनलाइनच्या सूत्रांनी दिली आहे.
मात्र या घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण याची चर्चा सध्या सुरू आहे, कारण सामान्य प्रशासन विभाग हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अख्यारित येते, तसेच राजशिष्टाचार विभागाची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे आहे, त्यामुळे विरोधकांनी आता सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट करण्यात सुरुवात केली आहे.