मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद जाहीर; भाई जगताप यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 09:03 PM2020-12-19T21:03:21+5:302020-12-19T21:15:58+5:30
Mumbai Congress President : काँगेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी काढलेल्या पत्रकात जगताप हे मुंबईचे अध्यक्ष, तर चरणसिंग सप्रा हे कार्याध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : लोकसभा, विधानसभेनंतर संजय निरुपम यांना पायउतार व्हावे लागल्याने रिक्त असलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आमदार भाई जगताप यांची वर्णी लागली आहे.
काँगेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी काढलेल्या पत्रकात जगताप हे मुंबईचे अध्यक्ष, तर चरणसिंग सप्रा हे कार्याध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून अमरजितसिंग आर मनहास यांना नियुक्त करण्यात आले आहे. अजेंडा आणि प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी सुरेश शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत सिंग मनहास आणि कामगार नेते भाई जगताप, माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी या तिघांमध्ये चुरस होती.
मुंबईच्या या समितीमध्ये प्रिया दत्त, अमीन पटेल, जेनेट डिसुझा, उपेंदर दोशी आणि महाराष्ट्र सरकारमधील मुंबईतील मंत्री व मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आदींचा समावेश आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्षांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर दि,2 व दि,3 डिसेंबर रोजी मुंबईत आले होते. मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीबद्धल मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली होती. त्यापूर्वी गेल्या ऑक्टोंबर तसेच दिवाळी नंतर दुसऱ्या दिवशी दि,17 नोव्हेंबर रोजी त्यांनी मुंबईचा दौरा केला होता. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार,माजी खासदार,माजी मंत्री,विद्यमान आमदार,विद्यमान मंत्री,विविध सेलचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली होती. ओपिनियन पोल द्वारे त्यांनी 227 ब्लॉक अध्यक्ष व विभागीय पदाधिकारी अश्या एकूण 550 जणांची त्यांनी मोबाईलवर चर्चा करून त्यांची मते देखिल अजमावली होती. या सर्व मान्यवरांनी डॉ. मनहास यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.