मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप, तर कार्यकारी अध्यक्ष चरणजितसिंग सप्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 05:34 AM2020-12-20T05:34:44+5:302020-12-20T05:35:14+5:30
Bhai Jagtap as the President of Mumbai Congress : मुंबई अध्यक्षपदासाठी अमरजितसिंग मनहास, भाई जगताप, नसीम खान आणि सुरेश शेट्टी यांच्या नावांची चर्चा होती.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबईकाँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक अर्जुनराव जगताप, उर्फ भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीने त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. कार्यकारी अध्यक्ष हे पददेखील तयार करण्यात आले असून, चरणजितसिंग सप्रा यांना या पदावर नेमले आहे.
मुंबई अध्यक्षपदासाठी अमरजितसिंग मनहास, भाई जगताप, नसीम खान आणि सुरेश शेट्टी यांच्या नावांची चर्चा होती. या सगळ्यांना वेगवेगळ्या समित्यांवर समाविष्ट करून काँग्रेसने अंतर्गत वाद कमी होतील याचे प्रयत्न केले आहेत. प्रचार समितीच्या अध्यक्षपदी मोहम्मद आरिफ नसीम खान यांची नियुक्ती केली आहे तर समन्वय समितीच्या अध्यक्षपदी अमरजितसिंग मनहास यांना नेमण्यात आले आहे. प्रचार आणि प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसच्या प्रभारीपदी प्रदेश काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांना नेमण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी चेहरा पक्षाने दिला आहे. त्यासोबत मुंबई काँग्रेसच्या कार्यकारी सदस्यपदी कॅम्पेनिंग कमिटी, समन्वय समिती, जाहीरनामा समिती, राज्य मंत्रिमंडळात असणारे मुंबईचे मंत्री, मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते, त्यासोबत माजी खासदार प्रिया दत्त, माजी आमदार अमीन पटेल, जेनेत डिसूजा, उपेंद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. के. सी. वेणुगोपाल यांच्या सहीने काढण्यात आलेल्या या आदेशात छाननी आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जी समिती करण्यात आली आहे तिच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सह अध्यक्ष म्हणून मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काम पाहतील. त्यासाठी सचिव म्हणून गणेश यादव यांची नेमणूक करण्यात आली.
काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. लवकरच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड जाहीर केली जाईल, असेही त्यांनी दिल्लीत सांगितले होते.