नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत बंदमध्ये संपूर्ण देशभरातील शेतकर्यांनी एकता दाखवली आहे. यामुळे केंद्र सरकारने शेतकर्यांच्या मागण्या मान्य करून त्यांच्याशी चर्चा करावी आणि तिन्ही कायद्यांमधील सुधारणा रद्द कराव्यात असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.
अमरिंदर सिंग यांनी "देशातील सर्व शेतकरी या विषयावर एकत्रित असून त्यामध्ये बदल करण्याची मागणी करत असताना केंद्र सरकार मात्र शेतकर्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष का करतंय? सरकारने या मुद्द्याशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे. मी सरकारमध्ये असतो तर कुठलाही उशीर न करता शेतकऱ्यांशी चर्चा केली असती आणि आपल्या चुका स्वीकारून कायद्यातील तिन्ही सुधारणा त्वरीत काढून टाकल्या असत्या" असं म्हटलं आहे.
"जुन्या कायद्यापासून शेतकऱ्यांना दूर का ठेवलं जातंय?"
केंद्र सरकारने बाजार समिती व्यवस्था काढून टाकण्याऐवजी सुरू ठेवायला हवी होती. कारण शेतकऱ्यांनाही तेच हवं आहे. जुन्या कायद्यापासून शेतकऱ्यांना दूर का ठेवलं जातंय. ते कायदे सुरूच ठेवले पाहिजेत. शेतकऱ्यांकडील कृषी माल खरेदी करण्यासाठी खासगी संस्थांना कोणीही अडवत नाही. मात्र दशकांपासून चालू असलेल्या कायद्याने शेतकऱ्यांसाठी फायदा होत आहे आणि त्यांना तो चांगल्याप्रकारे समजला आहे. यामुळे तो काढून टाकणं योग्य नाही असं पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना रुपाणी यांनी सणसणीत टोला लगावला आहे. "राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक माहिती आहे का?" असा सवाल विचारला आहे.
"राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?"
मेहसाणा येथील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना विजय रूपाणी यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस ज्या सुधारणांची वकीली करायची आज त्यालाच काँग्रेसकडून विरोध करुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच "मी राहुल गांधींना विचारु इच्छितो, तुम्हाला कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?" असं रूपाणी यांनी निशाणा साधला आहे. रूपाणी हे मेहसाणा येथे 287 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले नर्मदा पेयजल योजनेच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.