नवी दिल्ली - मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरीही त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आज 'भारत बंद 'ची हाक दिली आहे. या बंदमध्ये देशभरातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरी सहभागी झाले आहेत. कृषी विधेयकांना विरोधकांनी आणि सत्ताधारी एनडीएमधील काही घटक पक्षांनी विरोध दर्शविला. तरीही ही कृषी विधेयके मंजूर करण्यात आली. त्यामुळे देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारवर जोरदार टीका करत निशाणा साधला आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी (25 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार असं म्हणत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तर प्रियंका यांनी शेतकरी आपल्याच शेतात कामगार होईल असं म्हटलं आहे.
"शेतकरी आपल्याच शेतात कामगार होईल"
राहुल गांधी यांनी "एका चुकीच्या वस्तू आणि सेवा कराने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (MSME) संपवलं. आता नवे कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवतील" असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे प्रियंका गांधी यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. "शेतकऱ्यांना कंत्राटी शेतीद्वारे अब्जाधीशांचं गुलाम बनवण्यास प्रवृत्त केलं जाईल. शेतकऱ्यांना ना मोबदला, ना सन्मान. शेतकरी आपल्याच शेतात कामगार होईल, भाजपाचं कृषी विधेयक ईस्ट इंडिया कंपनीची आठवण करून देत आहे. आम्ही हा अन्याय होऊ देणार नाही" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी याआधीही मोदी सरकारवर निशाणा साधला होता. ''मोदींनी शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून, भांडवलदारांचा मोठा विकास केला'' अशी जोरदार टीका केली होती. पंतप्रधानांना राहुल गांधी यांनी त्यांच्या काही आश्वासनांची आठवण करून दिली आहे. "2014 - मोदीजींचे निवडणुकीचे आश्वासन स्वामीनाथन आयोगाचा MSP, 2015 - मोदी सरकारने न्यायालयात सांगितले की हे त्यांच्याकडून होणार नाही, 2020 - काळा शेतकरी कायदा. मोदीजींचा हेतू 'स्वच्छ', कृषीविरोधी नवा प्रयत्न, शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून, भांडवलदारांचा मोठा विकास" असं राहुल गांधी यांनी याआधी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
गलवानमध्ये 'इतके' सैनिक झाले ठार; चीनने पहिल्यांदाच दिली कबुली
"आम्ही आधी हात जोडत होतो, पण आता आपण दिल्ली हादरवू", हरसिमरत कौर यांचा इशारा
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता