चिपळूण : विधानसभा अध्यक्ष पदाबद्दल काही चर्चा माझ्या कानावर येत आहेत. पण माझी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, मंत्रिपदाचा बळी देऊन विधानसभेचे अध्यक्षपद नको. जर तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सन्मानाने अध्यक्षपद शिवसेनेला दिले आणि ती जबाबदारी माझ्याकडे आली तर मी आनंदाने स्वीकारेन, अशी स्पष्ट आणि रोखठोक शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी आपली भूमिका व्यक्त केली. बाकी भाजपच्या ईडी-फिडीला मी भीकदेखील घालत नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपलाही थेट सुनावले.विधानसभेचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन तालिका अध्यक्ष म्हणून गाजवल्यानंतर आमदार जाधव हे शुक्रवारी चिपळूणमध्ये आले. यावेळी शिवसैनिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांच्या कार्यालयात जमा झाले होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले गेले की, कित्येक वर्षाची इच्छा होती की एक दिवस तरी अध्यक्ष पदावर बसावे आणि नियमाप्रमाणे कामकाज करून दाखवावे. ही इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केली. त्याबद्दल आपण त्यांचे आभारी असल्याचे ते म्हणाले.मुळात मी अध्यक्ष पदावर बसावे आणि भाजपचे १२ आमदार निलंबित करावे असे काहीच नव्हते. मला त्याठिकाणी बसून पूर्ण नियमप्रमाणे सभागृहाचे कामकाज करून सभागृहाची शिस्त आणि परंपरा राखायची होती. परंतु भाजपचे आमदार आणि विशेष करून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीच ते सर्व घडवून आणले. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. भाजपने स्वतः ओढवून घेतलेले ते संकट होते, असेही ते म्हणाले.
आमदारांचे निलंबन हे कधीही ठरवून केले जात नाही. त्यावेळच्या परिस्थितीनुसार ते निर्णय घेतले जातात. १२ आमदारच निलंबित का ? हा एक वेगळा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे. पण त्यावेळी ज्या आमदारांनी गैरवर्तन केले, त्यामध्ये १२ आमदारच दिसून आले. जर जास्त सापडले असते, तर आणखी आमदार निलंबित झाले असते.एखादे मंत्रिपद सोडून त्याऐवजी शिवसेनेला अध्यक्षपद मिळणार असेल तर ते आपल्याला नको आहे. मंत्रिपदाचा बळी देऊन अध्यक्षपद नको, अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचेही ते म्हणाले.ईडी-फिडीला भीक घालत नाहीभाजपला थेट अंगावर घेतल्यानंतर आता ईडी किंवा आणि यंत्रणेकडून चौकशीची भीती वाटते का? या प्रश्नावर संतप्तपणे आमदार जाधव म्हणाले की, मी अशा ईडी-फिडीला भीक घालत नाही. माझा मी खमका आहे. अशी किती आव्हाने मी अंगावर घेतली आणि झेपवली आहेत. कोणाला वाटत असेल भास्कर जाधव घाबरले तर तो त्यांचा भ्रम आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपला थेट सुनावले.