भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 11:46 AM2024-09-20T11:46:27+5:302024-09-20T11:53:26+5:30
Bhaskarrao Khatgaonkar : खासदार अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले भास्कर खतगावकरांनी अवघ्या काही महिन्यातच घरवापसी मार्ग स्वीकारला. खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांच्या पुढच्या राजकीय प्लॅनची चर्चा सुरू झाली आहे.
Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षांतरे सुरू झाली आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी राजकीय वाटचाली अनुकूल पर्यायांची निवड केली. त्यात आता नांदेडचे माजी खासदार भास्कर खतगावकर यांचाही समावेश झाला आहे. खासदार अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसमधूनभाजपात गेलेल्या खतगावकरांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे आता भाजपाकडून नवी ऑफर देण्यात आल्यानंतरही खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. खतगावकरांची घरवापसी अशोक चव्हाणांबरोबर भाजपासाठीही धक्का मानला जात आहे.
खासदार अशोक चव्हाण आणि भास्कर खतगावकर यांचे जवळचे नाते आहेत. खतगावकर हे अशोक चव्हाणांच्या बहिणीचे पती आहेत.
भास्कर खतगावकर सहा महिन्यातच काँग्रेसमध्ये
काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी भास्कर खतगावकर यांनी केली होती. लवकरच ते काँग्रेसमध्ये दिसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या स्नुषा डॉ. मीनल खतगावकरही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीआधी भास्कर खतगावकर त्यांच्या सुनबाई डॉ. मीनल खतगावकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपामध्ये अपेक्षाभंग झाल्यानंतर सहा महिन्यातच त्यांनी परतीचा मार्ग स्वीकारला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून डॉ. मीनल खतगावकर या इच्छुक होत्या. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती.
भाजपाने लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे खतगावकर नाराज झाले होते. खतगावकर यांना विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन दिले गेले होते. पण, तिथेही संधी दिली गेली नाही. त्यामुळे ते नाराज होते.
भाजपाकडून ऑफर, पण खतगावकरांचा नकार
नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत डॉ. मीनल खतगावकर यांना उमेदवारी देण्याची ऑफर भाजपाने खतगावकर यांना दिल्याचे समजते. पण, त्यांनी ही ऑफर नाकारली.
नांदेड लोकसभा मतदारसंघावर चव्हाण कुटुंबीयाचाच अधिकार आहे. ही आमची संस्कृती नाही. पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाण यांना माझा पाठिंबा राहील, असे खतगावकरांनी भाजपा नेतृत्वाला कळवल्याचे सूत्रांनी सांगितले.
नायगाव मतदारसंघाचा मार्ग मोकळा
२००८ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर निर्माण झालेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण दोन वेळा आमदार बनले. आता त्यांचा मुलगा नांदेड लोकसभा निवडणूक लढवणार आहे. रवींद्र चव्हाण यांना पाठिंबा देत भास्कर खतगावकर यांनी वसंतराव समर्थकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्नही केला आहे.
भास्कर खतगावकर हे त्यांच्या सुनबाई डॉ. मीनल खतगावकर यांना नायगाव विधानसभा मतदारसंघातून उतरवण्याची तयारी करत आहेत. खतगावकर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशानंतर नायगाव मतदारसंघातील समीकरणे बदलणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसमधील इच्छुकांची आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हानही खतगावकरांसमोर असणार आहे.
२०१९ मध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे राजेश पवार यांनी वसंतराव चव्हाण यांचा पराभव केला होता. राजेश पवार यांना १ लाख १७ हजार ७५० मते मिळाली होती. तर वसंतराव चव्हाण यांना ६३ हजार ३६६ मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे मारोतराव कावळे गुरुजी यांना २३,००५ मते मिळाली होती.