काँग्रेसला मोठा धक्का, मुंबईतील बडा नेता उद्या भाजपात प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 05:00 PM2021-07-06T17:00:08+5:302021-07-06T17:03:01+5:30
Kripashankar Singh News: मुंबई काँग्रेसशी संबंधित असलेल्या एका बड्या नेत्याने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच काळाने आता भाजपामध्ये प्रवेश करण्याची तयारी केल्याचे वृत्त आले आहे.
मुंबई - राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर काँग्रेसमधून बड्या नेत्यांचे भाजपामध्ये पक्षांतर होण्याची मालिका सुरूच आहे. गेल्या काही काळात ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत कमळ हातात घेतल्यानंतर आता मुंबई काँग्रेसशी (Congress) संबंधित असलेल्या एका बड्या नेत्याने (Kripashankar Singh) पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच काळाने आता भाजपामध्ये (BJP) प्रवेश करण्याची तयारी केल्याचे वृत्त आले आहे. ( Former Congress leader Kripashankar Singh will join BJP tomorrow)
काँग्रेसचे मुंबईतील माजी नेते तसेच राज्य सरकारमधील माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी १२ वाजता भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. कृपाशंकर सिंह हे गेल्या बऱ्याच काळापासून पक्षीय राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. दरम्यान, उद्या ते भाजपाचे कमळ हाती घेणार असल्याचे वृत्त आहे. मुंबई काँग्रेसमधील उत्तर भारतीय नेत्यांपैकी ते एक नेते आहेत.
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेले कृपाशंकर सिंह यांनी जम्मू-काशमीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याला पक्षाने विरोध केल्याचे निमित्त साधून २०१९ मध्ये काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र तेव्हापासून ते कुठल्याही पक्षाशी संलग्न नव्हते. मात्र ते लवकरच भाजपाच प्रवेश करतील असे सांगण्यात येत होते. देवेंद्र फडणवीस यांनीही कृपाशंकर सिंह हे लवकरच भाजपात प्रवेश करतील, असे संकेत दिले होते.
कृपाशंकर सिंह हे मुंबईतील कालिना विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. तसेच त्यांनी काही काळ राज्याचे गृहराज्यमंत्रिपदही सांभाळले होते. त्याबरोबरच कृपाशंकर सिंह यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदही सांभाळले होते.