मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरेंचे शिलेदार विदर्भातील खंदे समर्थक अतुल वांदिले यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. मनसेचं जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असून पक्ष बांधणीत कुणीही पुढे येत नाही असा आरोप करत अतुल वांदिले यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत मुंबईत खासदार शरद पवारांच्या(NCP Sharad Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.
अतुल वांदिले(Atul Wandile) यांच्यावर मनसेच्या राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. हिंगणाघाट येथे वांदिले यांचे कार्यक्षेत्र आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नव्याने राज्याचा दौरा करत पक्ष संघटनेला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे मनसेला एकामागून एक धक्के बसत आहेत. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येण्यापूर्वीच मनसेच्या महिला उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाला रामराम केला. त्यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
कोण आहेत अतुल वांदिले?
अतुल वांदिले हे तैलिक महासंघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहेत. युवा आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. ते हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, आता त्यांनी मनसेला रामराम करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मनसेला गळती लागली असून पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.
अतुल वांदिलेंसह मनसे पदाधिकाऱ्यांचाही पक्षाला रामराम
मनसेचा विदर्भातील चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतुल वांदिले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाला बळ मिळणार आहे. मनसे विदर्भात वाढला नाही. राज ठाकरेंवर आमची नाराजी नाही परंतु इतर फळीतील नेत्यांनी कधीही पक्षवाढीसाठी दौरे, कार्यक्रम आखले नाहीत. मग याठिकाणी का थांबायचं असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. त्यामुळे मनसेच्या ३०-४० पदाधिकाऱ्यांसह वांदिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अतुल वांदिले यांच्या मनसे सोडण्यानं वर्धा जिल्ह्यात पक्षाला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.