Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "पालकमंत्री ऐकत नाहीत. त्यामुळे राजकारण करायचे तरी कशाला, चांगल्या कामाला सहकार्य करू. मी पक्ष सोडणार नाही, पण मी आणि आमच्या घरातील कोणीच निवडणूक लढवणार नाही", असे म्हणत आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आमदार पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून अन्याय केला जात असल्याची खदखदही व्यक्त केली आहे.
आमदार लक्ष्मण पवार म्हणाले की, "गेल्या काही महिन्यांपासून मी आजाही आहे. पण, आजारापेक्षा माझी नाराजी जास्त आहे. पक्षश्रेष्ठींसमोर मी हा विषय बोललो. त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. २०१४ ते २०१९ हा माझ्या आमदारकीचा काळ मला समाधान देणारा राहिला."
"या राजकारणाची कधी कधी किळस येते"
आमदार लक्ष्मण पवार म्हणाले की, "१० वर्षांपूर्वी जे राजकारण होते, तसे आता राहिले नाही. ज्या दिशेने राजकारण जात आहे, ते मनाला पटत नाही. नैतिकतेला बरे वाटत नाही. त्यामुळे आपणच बाजूला झालेले बरे, म्हणून मी हळूहळू सर्व मनाला न पटणाऱ्या बाबीतून बाजूला होत आहे. कुठलीही उमेद राहिलेली नाही. काम करत असताना सोबतचे आणि वरचे बळ देणारे असले, तर आणखी गतीने काम होते. आता अशी परिस्थिती राहिल आहे का?", अशी खंत त्यांनी सध्याच्या राजकारणाबद्दल व्यक्त केली.
"मी ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करत आहे, त्यांच्या व्यथा मांडण्याची माझी जबाबदारी आहे की नाही? गेवराईमध्ये एक चांगला तहसिलदार मागितला होता. जो नियमात काम करणारा असेल. पण, जेवढे तहसिलदार गेवराईत आले, ते सर्व वाळुवाल्यांशी संगनमत करणारे होते. मी वाळुवाल्यांविरोधात लढा दिला. त्याला बळ देणारे अधिकारी हवे होते. पालकमंत्र्यांकडे तहसिलदारांच्या तक्रारी केल्या. त्या पालकमंत्र्यांनी कधीच गांभीर्याने घेतल्या नाही", असे म्हणत आमदार लक्ष्मण पवार यांनी धनंजय मुंडेंकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले.
भाजप सोडणार नाही -लक्ष्मण पवार
पक्षांतर करण्याबद्दलच्या चर्चांवर बोलताना आमदार पवार म्हणाले की, "माझ्याबद्दल मतदारसंघात अफवा पसरवल्या जात आहेत. मी दलबदलू नाही. ज्या पक्षाने आपल्याला संधी दिली, त्या पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांपैकी मी नाही. नाराजी जरूर आहे. परंतू पक्ष सोडणार नाही. विनाकारण वेगळ्या चर्चा करण्यात अर्थ नाही", असे त्यांनी स्पष्ट केले.
"दोन- अडीच वर्षापूर्वी आम्ही सत्तेत गेलो, तीन पक्षांचे सरकार आले. खूप काही अपेक्षा होत्या, परंतू त्या पूर्ण झालेल्या नाहीत", अशी नाराजी आमदार लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केली.