...तेव्हा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मागितला होता खडसेंचा राजीनामा; हा पाहा पुरावा!
By प्रविण मरगळे | Published: October 22, 2020 09:05 AM2020-10-22T09:05:45+5:302020-10-22T09:12:42+5:30
Eknath Khadse, NCP News: भाजपानं केलेल्या मेगाभरतीला एकनाथ खडसेंच्या रुपाने मेगागळती लागण्याची चिन्हे आहेत, एकनाथ खडसेंनी ४० वर्षानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रविण मरगळे
मुंबई – राजकारणात कोणीही कायमचा मित्र नसतो अथवा कोणीही शत्रू नसतो, याचा प्रत्यय गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रखरतेने दिसून येतो. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी उलथापालथ झाली, एकमेकांचे कट्टर विरोधक सत्तेसाठी एकत्र आले तर जिगरी दोस्त एकमेकांसमोर उभे राहिले. सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला राज्यात विरोधी बाकांवर बसावं लागलं. निवडणुकीपूर्वी भाजपाने विरोधी पक्षाच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात पक्षात सामावून घेतलं होतं.
भाजपानं केलेल्या मेगाभरतीला एकनाथ खडसेंच्या रुपाने मेगागळती लागण्याची चिन्हे आहेत, एकनाथ खडसेंनी ४० वर्षानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी २३ तारखेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे पक्षात प्रवेश करतील, खरंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी तिकीट नाकारल्यापासून खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू होती. जाहीर व्यासपीठावरून एकनाथ खडसेंनी भाजपातंर्गत नाराजी व्यक्त केली होती.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तातर झालं, तेव्हा भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार म्हणून एकनाथ खडसेंचे नाव घेतलं जात होतं, मात्र प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळालं आणि एकनाथ खडसेंच्या वाट्याला महसूल मंत्रीपद आलं. पुणे येथील भूखंड घोटाळा, दाऊद कनेक्शन, पीए लाच प्रकरण अशा एकामागोमाग एक घोटाळ्यांच्या आरोपांनी एकनाथ खडसेंविरोधात वातावरण तयार झालं, तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. एकनाथ खडसे यांच्यावर होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे दिसून येत असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंचा राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीनं केली होती. विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी तेव्हाचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांना भेटून एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही नैतिकतेच्या आधारावर एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला पाहिजे अशाप्रकारे मागणी केली होती.
एकनाथ खडसेंनी हातात ‘घड्याळ’ बांधलं आता पंकजा मुंडेंनी 'शिवबंधन' बांधावं, शिवसेनेची ऑफर
काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
एकाही राजकीय पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप यांनी माझ्या राजीनाम्याची आणि चौकशीची मागणी केलेली नव्हती, विधानमंडळात कोणी आक्षेप घेतला असेल, चौकशी करा असं म्हटलं असेल तर मी एका मिनिटात राजकारण सोडायला तयार आहे. राजीनाम्याची मागणी केलेली नसताना माझा राजीनामा घेतला गेला असं विधान खडसेंनी भाजपा सोडताना केलं होतं.