कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागले आहे. गेल्याच आठवड्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेली असल्याने केंद्र विरोधात राज्य सरकारमध्ये दरी वाढू लागली आहे. यातच आज ममता बॅनर्जी यांच्या एका माजी मंत्र्याने विधानसभेत जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
गेल्या काही काळापासून तृणंमूल काँग्रेसमध्ये नाराज असलेले ममता सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रीपदाचा आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. तसेच ते तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा चर्चाही बंगालच्या राजकारणात रंगल्या होत्या.
पश्चिम बंगालच्याराजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. काही दिवसांपूर्वीपासून ते भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आपल्या राजीनामापत्रात शुभेंदू अधिकारी म्हणाले की, मी माझ्याकडील मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी राज्यपालांनाही याबाबतची माहिती दिली आहे. तुम्ही मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.
मध्यंतरी ममता यांनी त्यांची समजूत घातल्याचे वृत्त आले होते. मात्र, अधिकारी यांनी आज पश्चिम बंगाल विधानसभेत जात आमदारकीचाही राजीनामा दिल्याने हा ममता यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अधिकारी यांना भाजपात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत.
अधिकाऱ्यांचे जाणे परवडणार नाहीआपल्या संघटनात्मक कौशल्यामुळे शुभेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व म्हणून समोर आले होते. दोन वेळा खासदार राहिलेले शुभेंदू हे नंदिग्राममधील आंदोलनामुळे चर्चेत आले होते. या आंदोलनाने बंगालच्या राजकारणाची दिशा बदलली होती. यामुळे त्यांचे पक्ष सोडून जाणे ममता बॅनर्जींना परवडणारे नाहीय.