मुंबई - मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे भाजपाची ठामपणे नारायण राणेंच्या मागे उभा राहिलेला दिसत आहे. दरम्यान, भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनंतर आता केंद्रीय पातळीवरूनही नारायण राणेंना पाठिंबा मिळत आहे. अटकेच्या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनीही नारायण राणेंना फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. (After the arrest, Narayan Rane was called by Amit Shah)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी नारायण राणेंना फोन केल्याची माहिती भाजपा नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे. यावेळी अमित शाहांनी नारायण राणेंशी चर्चा करत त्यांच्याकडून पोलिसांनी केलेले कारवाई आणि अटकेच्या कारवाईबाबतचे तपशील याबाबत माहिती घेतली. नारायण राणेंच्या अटकेची थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतल्याने आता या प्रकरणात भाजपा पुढे काय करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, नारायण राणेंच्या विधानाशी सहमती दर्शवली नसली तरी भाजपा राणेंच्या पाठीशी उभा राहील, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नाराणय राणेंच्या मागे पक्ष उभा राहील असे सांगितले होते. तसेच नारायण राणेंवरील कारवाईविरोधात भाजपानेही तीव्र आंदोलने केली होती. आता अटकेच्या कारवाईमुळे थांबलेली भाजपाची जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे.
जामिनावर सुटल्यानंतर काल नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी लक्षात ठेवा, तुम्ही माझे काहीही करू शकत नाही. मी तुम्हाला घाबरत नाही. दरवेळी तुम्हाला पुरून उरलो आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी शिवसेनेला डिवचले. आपली जन आशीर्वाद यात्रा २७ ऑगस्टपासून सिंधुदुर्गपासून पुन्हा सुरू होईल, असे त्यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी अटक झाल्यानंतर महाड कोर्टाने मंगळवारी रात्री राणे यांना जामीन मंजूर केला होता.
नेमकं काय आहे प्रकरणमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती. त्यानंतर राणेंना अटक करून महाड येथील कोर्टात हजर करण्यात आले होते. अखेर रात्री उशिरा नारायण राणेंना जामीन मंजूर झाला होता.