Cabinet reshuffle: देशात सध्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थानमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापलेले आहे. बंगालच्या निवडणुकीनंतरच्या पराभवानंतर भाजपात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. यामध्ये केवळ योगींचे मंत्रिमंडळच नाही तर पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. (Speculation is rife that Prime Minister Narendra Modi is planning to reshuffle the Cabinet.)
या पार्श्वभूमीवर भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा (J.P. Nadda) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांच्या मंत्र्यांशी बोलत आहेत. त्यांच्या संबंधित मंत्रालयांची माहिती घेत आहेत. आज नड्डा आणि गृहमंत्रीअमित शहा देखील मोदींशी चर्चा करणार आहेत. आज तकने सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे.
उद्या शनिवारी धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, गजेंद्र सिंह शेखावत, महेंद्र नाथ पांडेय, हरदीप पुरी यांच्यासोबत मोदी चर्चा करणार आहेत. त्यांच्याकडून त्यांनी केलेल्या कामाची माहिती घेणार आहेत. या आधी व्ही के सिंह आणि अन्य मंत्र्यांसोबत मोदींनी बैठक घेतली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळ बदल केले जाणार आहेत, असे सुत्रांनी सांगितले.
उत्तर प्रदेशवरून गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या हालचाली झाल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना बदलण्याची चर्चाही जोर धरत होती. मात्र, भाजपानेच योगीच मुख्यमंत्री राहतील असे स्पष्ट करत योगींच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे संकेत दिले होते. यामुळे योगी देखील गुरुवारीच दिल्लीत दाखल झाले होते. योगींनी शुक्रवारी मोदींची भेट घेत सुमारे 80 मिनिटे चर्चा केली.
देशाच्या सत्ताकारणात उत्तर प्रदेश एक मोठे आणि महत्वाचे राज्य आहे. कारण हेच राज्य लोकसभेचे बहुमत ठरविणार आहे. यामुळे अमित शहा यांनी नुकतीच अनुप्रिया पटेल, संजय निषाद यांची भेट घेऊन उत्तर प्रदेशमध्ये सहकारी पक्षांना सोबत घेण्यासाठी चर्चा केली होती. यावेळी पटेल यांनी केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद देण्याची मागणी केली होती.