मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विविध मुद्द्यांवरून सुरू असलेल्या कुरबुरी, तसेच सीबीआय, ईडीसारख्या तपास यंत्रणांकडून राज्यातील सत्ताधारी पक्षामधील अनेक नेत्यांवर टाकण्यात येत असलेले चौकशांचे जाळे यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थिरतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. (Sanjay Raut) राज्यात सत्तांतर होत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. (Ashish Shelar) त्याचदरम्यान, आता राज्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. (Secret meeting between Sanjay Raut and Ashish Shelar, discussion in political circles)
शिवसेनेने भाजपाशी असलेली युती मोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची केलेल्या स्थापनेदरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आणि सामनामधील अग्रलेखांमधून तसेच पत्रकार परिषदेमधून बोचरी टीका करत भाजपाला जेरीस आणणारे शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात आज मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची बातमी समोर आली आहे. टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढील आठवड्यात होणार आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे कधीही पडणार असल्याचे दावे भाजपाच्या नेत्यांकडून केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात मुंबईतील नरिमन पॉईंट येथे ही गुप्तभेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच दोन्ही नेत्यांच्या कार या एकाच ठिकाणाहून बाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान, अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिले आहे.
दरम्यान, या संदर्भात भाजपाचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीबाबत मोघम प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही भेट राजकीय नसावी, तर ती सदिच्छा भेट असावी, असा दावा त्यांनी केला आहे. या भेटीत काही राजकीय संदर्भ आहेत का याबाबत पक्षीय पातळीवर माझ्याकडे काही माहिती नाही,असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.