AAP-Congress Delhi Elections: लोकसभा निवडणुकीनंतर उभारी घेण्याचे प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीने जोरदार धक्का दिला. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी एकसंघ राहिल्याने त्याचे परिणाम निकालात दिसले. पण, हरयाणात स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला. याच मुद्द्यावर बोट ठेवत आम आदमी पक्षाने आता दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे.
आप सोडणार काँग्रेसचा हाथ
हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रभावी कामगिरी करू न शकल्याने आपने आता दिल्लीतही एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका कक्कर यांनी याबद्दल मोठं विधान केलं आहे.
आप नेत्या प्रियंका कक्कर म्हणाल्या, "आम्ही दिल्ली (विधानसभा) निवडणूक स्वबळावर लढू. एकीकडे अतिआत्मविश्वास असणारी काँग्रेस आहे, तर दुसरीकडे गर्विष्ठ भाजपा आहे. आम्ही गेल्या १० वर्षात दिल्लीत जे केले आहे, त्या आधारावरच आम्ही निवडणूक लढणार आहोत", असे सांगत कक्कर यांनी दिल्लीत काँग्रेस-आप आघाडी होणार की नाही? हा प्रश्न तूर्तास तरी निकाली काढला आहे.
काँग्रेसची कामगिरी सुधारली, पण सत्तेपासून दूरच
सलग तिसऱ्यांदा भाजपाने काँग्रेसला हरयाणात धूळ चारली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ३० जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत त्यांची कामगिरी सुधारली आहे. पण, खऱ्या अर्थाने भाजपाने प्रभावित केले आहे. कारण सलग दहा वर्ष सत्तेत राहूनही भाजपाने केवळ सत्ताच राखली नाही, तर गेल्या वेळच्या तुलनेत जास्त जागा निवडून आणल्या आहेत.
काँग्रेसवर आपची टीका
आपचे खासदार संजय सिंह यांनी काँग्रेसच्या एकट्याने निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. "आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसने प्रतिसादच दिला नाही. त्यांना सत्तेत कुणीही नको होतं म्हणून स्वतंत्र लढले", असे म्हणत संजय सिंह यांनी काँग्रेसला सुनावले आहे.