लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यावरून विधानसभेत बराच गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकामंध्ये जोरदार घोषणाबाजी झाल्याने अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज दहा मिनिटे स्थगित करावे लागले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदिराच्या देणगीचा विषय उपस्थित करत भाजपवर शरसंधान साधले. राम मंदिराच्या उभारणीसाठी तुम्हाला कोणी पैसे गोळा करायला सांगितले? पैसे गोळा करण्याचा ठेका तुम्हाला रामाने दिला? आहे का, असा सवाल पटोले यांनी करताच भाजप सदस्यांनी त्यास जोरदार आक्षेप घेतला. मात्र पटोले यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपले म्हणणे रेटले. पटोले म्हणाले, माझ्याकडे मनोहर कुलकर्णी नावाचे गृहस्थ आले होते. श्रीरामाच्या मंदिरासाठी निधी देण्यास नकार दिल्याने त्यांना धमक्या देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मंदिरासाठी विना परवानगी असा निधी गोळा करण्याचा ठेका या लोकांना कोणी दिला? धर्मादाय आयुक्तांची रीतसर परवानगी घेतली होती का? असे सवालही पटोले यांनी केले.? त्यावरुन भाजप सदस्य आक्रमक झाले. सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला. आज हा विषय नसताना त्यावर चर्चा करणे योग्य नाही. हिंमत असेल तर राममंदिरावर स्वतंत्र चर्चा लावा, असो आव्हान त्यांनी सत्तापक्षाला दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब केले.
त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलावण्यात आले. तेथे एक बैठक झाली. त्या काळात भाजपचे सदस्य सभागृहात घोषणा देतच होते. नंतर मात्र सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरु झाले.
देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल होणारnविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात सोशल मीडियात एक पोस्ट आणि एका पोर्टलची बातमी व्हायरल झाली आहे. त्यावरून विधानसभेत गोंधळ झाला. काँग्रेस आमदार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या पोस्टचा उल्लेख विधानसभेत केल्याने भाजपचे आमदार संतापले. देवेंद्र फडणवीस यांनीही या पोस्टबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. nफडणवीस यांनी नाना पटोले यांचे आभार व्यक्त करत, त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर आहे. माझ्याविषयी पोस्ट लिहिणारा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यावर तुम्ही कारवाई करणार का?, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला होता. त्यावर गुन्हा दाखल करून आजच अटकेची कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.