पाटणा : बिहार विधानसभेतील काँग्रेसच्या १९ आमदारांपैकी ११ आमदार पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते व माजी आमदार भरतसिंह यांनी केला आहे.
ते म्हणाले की, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ पाहणारे आमदार हे मुळात याआधी दुसऱ्या पक्षांतून काँग्रेसमध्ये आले होते. या लोकांनी भरपूर पैसे देऊन विधानसभा निवडणुकांत उमेदवारीची तिकिटे विकत घेतली व ते आमदार झाले. बिहारमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेशप्रसाद सिंह, काँग्रेसचे बिहार प्रदेशाध्यक्ष मदनमोहन झा, ज्येष्ठ काँग्रेस नेते सदानंद सिंह हेदेखील पक्षत्याग करू शकतात. या नेत्यांनी नेहमीच पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत, असा आरोप भरतसिंह यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय जनता दलाबरोबर काँग्रेसने युती करण्यास माझा ठाम विरोध होता. या युतीमुळे काँग्रेसने स्वत:चे खूप मोठे नुकसान करून घेतले. (वृत्तसंस्था)
काँग्रेस पक्ष कोमात : जनता दल (यू) जनता दल (यू)चे नेते राजीव रंजन यांनी सांगितले की, भरतसिंह यांची वक्तव्ये पाहता काँग्रेस पक्ष कोमामध्ये गेला असल्याचे स्पष्ट होते. काँग्रेसची गलितगात्र अवस्था लक्षात आल्यानेच त्या पक्षाचे नेते शक्तिसिंह यांनी स्वत:ला पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त करून घेतले. काँग्रेस नेत्यांनी स्वत:च्या पक्षाला वाचविले पाहिजे; पण ते काम वाटते तितके सोपे नाही.