नवी दिल्ली : बिहार विधानसभेची आगामी निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) भाजप, जेडीयू आणि लोजप हे तीनही घटक पक्ष मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमार यांच्यासमवेत एकत्रित लढवतील, अशी घोषणा भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली.
जेडीयू आणि चिराग पासवान यांच्या लोजपदरम्यान कुरबूर चालू असताना बिहार प्रदेश भाजप कार्यकारिणी बैठकीच्या समारोप सत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यामातून संबोधित करताना नड्डा यांनी उपरोक्त स्पष्टोक्ती दिली. बिहारमध्ये सत्तारूढ एनडीए एकजूट असल्याचा दावा करणारा भाजप नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्यावर आग्रही होती. बिहार अािण इतरत्र विरोधी पक्षांचा अजिबात मागमूस नाही. जनता आशेने पाहणारा भाजपच एकमेव पक्ष आहे, असा दावाही त्यांनी केला. विरोधी पक्षांकडे कोणतीही तत्त्वे नाहीत, दृष्टिकोनही नाही. तसेच जनतेची सेवा करण्याची भावना विरोधकांच्या ठायी नाही. आम्ही निश्चित विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
क्षुल्लक राजकारणाशिवाय विरोधक दुसरा विचारच करू शकत नाहीत. भाजप आणि रालोआबाबत बिहारची जनता आशावादी आहे. जनतेसाठी पुढेही आम्ही काम करीत राहू. कार्यकर्त्यांनी भाजपला विजयी करण्यासोबतच मित्र पक्षांना मजबूत करावे लागेल. मित्र पक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप काम करील, अशी ग्वाहीही नड्डा यांंनी दिली.निवडणूक वेळेवरच होईल...कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून होत असताना बिहार विधानसभेची निवडणूक वेळेवर होईल, असे निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपणार आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान निवडणूक होईल, असेही संकेत आहेत. अलीकडेच निवडणूक आयोगाने कोरोनाच्या काळात निवडणुका घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. नियम पाळून निवडणूक प्रक्रिया पार पडेल.