पाटणा - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वादास सुरुवात झाल्यापासून बिहार पोलिसांचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचे नाव बरेच चर्चेत होते. दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच गुप्तेश्वर पांडेंनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर बक्सर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील. अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र जेडीयूने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज जाहीर केलेल्या ११५ उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचं नावच नसल्याने आता पांडे यांचं काय होणार याची चर्चा रंगली आहे.सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आक्रमक असलेले गुप्तेश्वर पांडे पोलीस सेवेतून अचानक स्वेच्छानिवृ्त्ती घेऊन राजकारणात आले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत दणक्यात जेडीयूमध्ये प्रवेश केल्याने त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार हे नक्की मानले जात होते. मात्र आता ही शक्यता मावळताना दिसत आहे. कारण जेडीयूने पांडे यांना तिकीट दिलेले नाही.जेडीयूने तिकीट न दिल्याने नोकरीही गेली आणि विधानसभेची उमेदवारीही गेली, अशी अवस्था झालेल्या गुप्तेश्वर पांडेंना आता भाजपाचा आधार मिळू शकतो. बक्सर जिल्ह्यामधील ब्रह्मपूर आणि बक्सर हे मतदारसंघ भाजपाकडे असून, तिथून भाजपाने आपले उमेदवार घोषित केलेले नाही. त्यामुळे आता गुप्तेश्वर पांडे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची आशा आहे.दरम्यान, पांडे यांना वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. ही जागा जेडीयू खासदार वैद्यनाथ प्रसाद महतो यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. या ठिकाणी १३ ऑक्टोबरपासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार असून, ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघावर एनडीएचा कब्जा आहे. मात्र या जागेवर वैद्यनाथ प्रसाद महतोंच्या मुलांची पहिली दावेदारी आहे. महतोंचे दोन मुलगे व्यावसायिक आहेत. तर सुनील कुमर हा तिसरा मुलगा राजकारणात सक्रिय आहे.