पाटणा: भारतीय जनचा पक्षाच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) मित्र पक्ष बाहेर पडत आहेत. गेल्या वर्षी शिवसेनेनं, तर गेल्याच महिन्यात शिरोमणी अकाली दलानं भाजपची साथ सोडली. मात्र बिहारमध्ये भाजपसाठी आनंदाची बातमी आहे. बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजप मित्रपक्षांसह सरकार स्थापन करेल, असा अंदाज टाईम्स नाऊ-सी व्होटरनं वर्तवला आहे. विशेष म्हणजे यंदा भाजप त्यांचा मित्रपक्ष संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा जिंकेल, अशी शक्यता आहे.टाईम्स नाऊ-सी व्होटरनं बिहारमधील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण केलं. यापैकी १६० जागांवर एनडीएचे उमेदवार विजयी होतील, असं टाईम्स नाऊ-सी व्होटरचं सर्वेक्षण सांगतं. बिहारमधील एनडीएचा विचार केल्यास सध्या संयुक्त जनता दल (जेडीयू) सर्वात मोठा पक्ष आहे. तर त्याखालोखाल सर्वाधिक आमदार भाजपचे आहे. मात्र यंदा भाजप ८५ जागा जिंकून जेडीयूला मागे टाकेल. तर जेडीयूला ७० जागा जिंकण्यात यश येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.२०१० मध्ये भाजपनं बिहारमध्ये जेडीयूसोबत निवडणूक लढवली होती. दोन्ही पक्षांनी मिळून तब्बल २०० हून अधिक जागा खिशात घातल्या होत्या. त्यावेळी भाजपचे ९१ उमेदवार विजयी झाले होते. बिहार विधानसभा निवडणुकीतील ही भाजपची सर्वाच्च कामगिरी होती. मात्र त्यावेळी जेडीयूनं ११५ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजप छोटा भाऊ होता. सध्याच्या घडीला जेडीयूचे ७१, तर भाजपचे ५३ आमदार आहेत. त्यामुळे आताही बिहारमध्ये भाजप छोटा भाऊच आहे.महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची युती झाली तेव्हा शिवसेना मोठा भाऊ होता. मात्र हळूहळू भाजपनं आपली ताकद वाढवली. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती पहिल्यांदा सत्तेत आली, त्यावेळीही शिवसेना मोठा भाऊ होता. २०१४ नंतर मात्र परिस्थिती बदलली. भाजपनं पहिल्यांदाच थेट १२२ जागापर्यंत मजल मारली. तर शिवसेनेला ६३ जागा जिंकता आल्या. त्यामुळे शिवसेनेला सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळालं. २०१९ मध्येही भाजपानं सर्वाधिक १०५ जागा मिळवल्या. राज्यात भाजपनं आपलं सामर्थ्य वाढवत छोट्या भावाला मागे टाकलं. आता तशीच परिस्थिती बिहारमध्ये निर्माण होताना दिसत आहे.
Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये होणार महाराष्ट्राची पुनरावृत्ती?; ओपिनियन पोलमध्ये भाजप सुस्साट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 8:05 AM