वाल्मीकीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांतील समस्यांबद्दल बोलताना दिसतात; पण भारतामधील बेरोजगारी व अन्य समस्यांबद्दल ते आपल्या भाषणांतून अवाक्षरही काढत नाहीत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी प्रचारमोहिमेच्या दुसऱ्या फेरीत पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मीकीनगर येथे बुधवारी जाहीर सभा घेतली. ते म्हणाले की, दसऱ्याच्या दिवशी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. ते पाहून मनाला वेदना झाल्या. मोदींविषयी युवक व शेतकऱ्यांच्या मनात किती संताप आहे याचेच दर्शन प्रतिमा दहनाच्या निमित्ताने घडले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासमवेत घेतलेल्या प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमध्ये इतर देशांतील समस्यांचा उल्लेख करतात; पण भारतातील समस्यांबद्दल ते काहीच बोलत नाहीत. ही गोष्ट बिहार, पंजाब, उत्तर प्रदेशमधील युवक, शेतकऱ्यांना खटकते आहे. राहुल गांधी म्हणाले की, आपण दोन कोटी नोकऱ्या देणार, असे आता मोदी भाषणांतून सांगत नाहीत. समजा तसे त्यांनी आता सांगितले तर सभेला आलेले श्रोतेच त्यांना रोखतील. तुम्ही नोकऱ्या देण्याबाबत खोटे बोलला आहात, असे लोकच मोदींना सांगतील. देशाचा कारभार कसा करायचा याची काँग्रेसला उत्तम जाण आहे. शेतकरी, युवकांना कशी साथ द्यायची हे आमच्या पक्षाला माहीत आहे. मात्र, खोटे बोलण्याची सवय काँग्रेसला नाही. (वृत्तसंस्था)
हा तर पायलट प्रोजेक्टराहुल गांधी म्हणाले की, २००६ साली बिहारमध्ये बाजार समित्या रद्द करण्यात आल्या. एक प्रकारे हा निर्णय तीन नवे कृषी कायदे संमत करण्याआधीचा पायलट प्रोजेक्ट असावा. जे नितीशकुमारांनी बिहारमध्ये २००६ साली केले तेच नरेंद्र मोदी आता पंजाबमध्ये करू पाहत आहेत.