पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या आरजेडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये आरजेडीने बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले माजी आमदार राजवल्लभ यादव आणि फरारी असलेले आरोपी आमदार अरुण कुमार सिंह यांच्याजागी त्यांच्या पत्नींना उमेदवारी जाहीर केली आहे.
आरजेडीने राजवल्लभ यादव यांची पत्नी विभा देवी यांना नवादा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर अरुण यादव यांच्या पत्नी किरण देवी यांना संदेश विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
राजदचे माजी आमदार असलेले राजवल्लभ यादव एका अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी सध्या तुरुंगात आहेत. फेब्रुवारी २०१६ मध्ये राजवल्लभ यादव यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये या.संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. राजवल्लभ यादव हे दोषी ठरल्यानंतर राजदने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जेडीयूच्या कौशल यादव यांनी बाजी मारली होती. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठीदेखील नवादा येथून विभा देवी यांनाच आरजेडीने उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना लोकजनशक्ती पार्टीच्या चंदन सिंह यांनी पराभूत केले होते. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे विभा देवी यांना ३ लाख ४७ हजार हून अधिक मते मिळाली होती. तसेच त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या.
दरम्यान, अरुण यादव यांच्यावरसुद्धा बलात्काराचे आरोप झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून ते फरार आहेत. दोन वेळा आमदार राहिलेल्या अरुण यादव यांचे मोठे भाऊ विजयेंद्र यादव यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. ते आरजेडीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. मात्र तिकिटाचे आश्वासन न मिळाल्याने विजयेंद्र यांनी पक्ष बदलला होता.