- बाळकृष्ण परब बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सलग १५ वर्षांपासून बिहारमध्ये सत्तेवर असलेल्या नितीशकुमार सरकारविरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी, एकत्र निवडणूक लढवत असूनही भाजपा आणि जेडीयूमध्ये परस्परांबाबत असलेला अविश्वास, एनडीए न सोडता चिराग पासवान यांनी मांडलेली वेगळी चूल आणि लालू यादव यांच्या अनुपस्थितीत आरजेडीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीची धुरा एकहाती सांभाळणाऱ्या तेजस्वी यादव यांनी प्रचारात घेतलेली जोरदार आघाडी यामुळे काही दिवसांपूर्वी अगदीच एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता कमालीची अटीतटीची बनली आहे. त्यामुळे आता नितीश कुमार आपली सत्ता राखणार की युवा तेजस्वी यादव यावेळी बिहारचं मैदान मारणार याबाबतच्या वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.बिहार विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतच्या घटनाक्रमाचा आढावा घेतल्यास ही निवडणूक नितीश कुमार यांची जेडीयू आणि भाजपासाठी ही निवडणूक तितकीशी सोपी राहिलेली नाही. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासून एनडीएमध्ये सुरू असलेला सावळागोंधळ तसेच निवडणुकोत्तर परिस्थितीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चा यामुळे संभ्रम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात चिराग पासवान यांनी भाजपाला पाठिंबा असल्याचे सांगत थेट नितीश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडल्याने भाजपाची गोची झाली आहे. त्यामुळेच भाजपाच्या बड्या नेत्यांना भाजपा मोठा पक्ष ठरला तरी बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असं वारंवार सांगावं लागत आहे.
लालूप्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीमुळे आपला फायदा होईल, असा भाजपा आणि जेडीयूचा असलेला समज फोल ठरताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांनी महाआघाडीचा मोर्चा सक्षमतेने सांभाळण्यात यश मिळवले आहे. त्यातही त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने एनडीएच्या चाणक्यांची समीकरणे गडबडली आहेत. तसेच एकतर्फी होणारी निवडणूक अटीतटीच्या लढाईपर्यंत आली आहे. मात्र असं असलं तरी नितीश कुमार आणि भाजपाच्या यांच्या हातून बाजी निसटली आहे असं म्हणणं घाईचं ठरेल. त्याचं कारण बिहारमधील राजकीय आणि जातीय समीकरणांमध्ये दडलेलं आहे.महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळून अनेक वर्षे लोटली आहेत. बिहारमध्येही गेल्या का वर्षांपासून आघाड्यांचे राजकारण सुरू आहे. त्यातही हे राजकारण लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, नितीश कुमार यांचा जेडीयू आणि भाजपा या तीन पक्षांभोवती केंद्रित आहे. या तीनपैकी जे दोन पक्ष एकत्र येतात त्यांचा सत्तेचा मार्ग सोपा होतो. २०१५ मध्ये लालूंचा राजद आणि नितीश कुमारांचा जेडीयू एकत्र आल्याने भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले होते. आता जेडीयू आणि भाजपा एकत्र आहेत. तर राजद आणि काँग्रेसची महाआघाडी मैदानात आहे.यातील महत्त्वाची बाब म्हणजे राजद, जेडीयू आणि भाजपा या तिन्ही पक्षांचा स्वत:चा असा जनाधार आहे. काही झाले तरी हा मतदार या पक्षांपासून दुरावत नाही. त्यामुळेच भाजपाला २०१५ मध्ये प्रबळ महाआघाडीविरोधात लढूनही ५३ जागा मिळाल्या होत्या. तर नितीश कुमार यांची एकछत्री राजवट असतानाही लालूंच्या आरजेडीला आपला प्रभाव टिकवता आलाय. त्यामुळे या तीनपैकी दोन पक्ष एकत्र आल्यावर विजय पक्का, असं समीकरण आहे. म्हणूनच २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, नितीश आणि पासवान यांचे पक्ष एकत्र आल्यावर त्यासमोर लालूंच्या महाआघाडीची दाणादाण उडाली होती. मात्र आता या समीकरणांमध्ये काहीसा बदल झालाय. पासवान यांना लोकजनशक्ती पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतोय. त्यामुळे एनडीएचे बळ किंचीत घटले आहे. दुसरीकडे तेजस्वी यादव यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला असला तरी त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसचे बिहारमधील अस्तित्व यथातथा आहे. त्यामुळे ही निवडणूक आरजेडीला एकहाती लढावी लागत आहे.त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन निवडणुकांमधील मतदानाचे गुणोत्तर आणि सध्याचा मतदारांचा कल विचारात घेतला तर ही निवडणूक अटीतटीची होत असली तरी त्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव होईल, असं वाटत नाही. आता एनडीएला २०१९ ची लोकसभा आणि २०१० च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे एकतर्फी यश मिळेल, असं वाटत नाही. मात्र नितीश कुमार आणि एनडीएला प्रतिष्ठा राखण्याइतपत जागा मिळतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्यासाठी सत्ता अद्याप दूर दिसत असली तरी त्यांनी एनडीएची झोप उडवली आहे एवढं नक्की. आता त्यांचा पक्ष सत्तास्थानापर्यंत जाईल की नाही याची चर्चा अजून काही दिवस चालेल. पण बिहारमध्ये आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने त्यांनी एक पाऊल टाकलंय एवढं मात्र नक्की.