पाटना : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीसाठी भाजपा आणि जनता दल यूनायटेड (जदयू) यांची युती निश्चित झाली आहे. तर रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने नितीश कुमार यांचे नेतृत्व नाकारत या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) प्रमुख चिराग पासवान यांनी बिहारमध्ये १४३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
चिराग पासवान यांनी सोमवारी बिहारच्या मतदारांना खुले पत्र लिहून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधाला असून जनता दलाला मते न देण्याचे आवाहन केले आहे. "बिहार राज्याच्या इतिहासातील मोठा निर्णायक क्षण आहे. करोडो बिहारींच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. कारण, आता आपल्याजवळ गमवण्यासाठी आणखी वेळ नाही आहे. जदयूच्या उमेदवारास दिलेले एक मत सुद्धा उद्या तुमच्या मुलांना पळून जाण्यास भाग पाडेल," असे चिराग पासवान यांनी ट्विट केले आहे. या ट्विट सोबत त्यांनी बिहारमधील जनेतला उद्देशून एक भावनिक पत्र देखील जोडले आहे. यामध्ये नितीशकुमार यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र त्या पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत, असे चिराग पावसान यांनी म्हटले आहे.
दरम्यान, २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोजपने २४३ जागांपैकी फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. मतांची टक्केवारी होती ४.८३ टक्के. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोजपने लढवलेल्या सहाही जागा जिंकल्या होत्या. त्यात मोदी फॅक्टर कामाला आला होता. विधानसभा निवडणुकीत लोजप १४३ जागा लढवणार आहे.
तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.