नवी दिल्ली - बिहार व अन्य राज्यांत भाजपाने चांगले यश मिळविले. त्यामुळे मोदी व भाजपा यांची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट होते. बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रभारी म्हणून काम पाहणारे देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत. "बिहारच्या जनतेने त्यांना विकास हवा असून जंगलराज नको आहे हे दाखवून दिलं. तसेच देशातील 11 राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपाने मोठे यश मिळवले आहे. बिहारबरोबरच या राज्यांमध्ये जनतेने भाजपाला दिलेला कौल हा मोदींवरील विश्वासाचे प्रतिक आहे" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. "बिहारच्या जनतेने त्यांना विकास हवा असून जंगलराज नको आहे हे दाखवून दिलं. आमचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. नितीश कुमार यांच्यावर बिहारच्या जनतेने पूर्ण विश्वास टाकला आहे. मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो. बिहारमध्ये भाजपाने 110 जागांवर निवडणूक लढवली आणि त्यामध्ये विजयाची टक्केवारी 67 टक्के इतकी असून 2015 मध्ये हीच टक्केवारी 34 इतकी होती. याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदी यांच्या गरीब कल्याणकारी योजना आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जातं."
"देशातील 11 राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपाने मोठं यश मिळवलं"
"मी बिहारमधील भाजपाच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. संपूर्ण बिहारने कोरोना काळात देखील उत्साहाने निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला आणि संपूर्ण जगाला एक आदर्श घालून दिला. या यशस्वी निवडणुकीसाठी मी निवडणूक आयोगाचेही आभार मानतो. देशातील 11 राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपाने मोठं यश मिळवलं आहे. बिहारबरोबरच या राज्यांमध्ये जनतेने भाजपाला मिळालेला कौल हा मोदींवरील विश्वासाचे प्रतिक आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणाबरोबरच अन्य राज्यातील आमच्या भाजपा कार्यकर्त्यांचेही मी अभिनंदन करतो. या सर्व निवडणुकींमधील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी जे मार्गदर्शन केलं, जे कष्ट घेतले त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
"जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारलं"
निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. "बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासन यांची पुन्हा निवड करण्यासाठी मी बिहारच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो" असं म्हटलं आहे. तसेच बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारत एनडीएच्या विकासवादाची निवड केली असं देखील शहा यांनी म्हटलं आहे. "बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासन यांची पुन्हा निवड करण्यासाठी मी बिहारमधील सर्वांचे आभार मानतो. मुख्यत: बिहारचे तरूण आणि महिलांना धन्यवाद देतो ज्यांनी बिहारची सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्यासाठी एनडीएला बहुमत मिळवून दिलं" असं ट्विट अमित शहा यांनी केलं आहे.
"देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला"
"बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारत एनडीएच्या विकासवादाची निवड केली आहे. हा प्रत्येक बिहारवासीयाच्या आशा आणि आकांक्षांचा विजय आहे. या निवडणुकीमध्ये जनतेने ज्या उत्साहानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या धोरणांना समर्थन दिलं ते नक्कीच उल्लेखनीय आहे. या निकालामुळे मोदी सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या यशस्वी लढाईत गरीब, मजूर, शेतकरी आणि तरूण वर्गाचा विश्वास दिसून आलाच, पण त्याचबरोबर देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला" असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.