मुंबई - बिहारमधील विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Elections 2020) निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये (Bihar Assembly Election 2020 Exit Poll ) तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला कौल देण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीत कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या महाआघाडीत राष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे. तर दुसरीकडे नितीशकुमारांनाही बिहारमध्ये पुन्हा त्यांचंच सरकार येईल, अशी आशा आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तेजस्वी पर्व सुरू होईल असं म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. "बिहारमध्ये पूर्ण निकाल यायचे आहेत. जे कल पाहिले आहेत. त्यावरून तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. एका तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन ताकद उभी केली आहे. सध्या तिथे कांटे की टक्कर सुरू आहे. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल, मंगलराज सुरू होईल" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
"तरुण नेत्याने केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन उभी केली ताकद"
"बिहारमध्ये तरुणाने ज्या पद्धतीनं सर्वांसमोर आव्हान उभं केलं. ज्याप्रमाणे तो लढत आहे. मला वाटत हा एक चांगला संकेत आहे. जंगलराजविषयी बोललं जात होतं. 15 वर्षे बिहारमध्ये कोण सत्तेत होतं? कोणाचं जंगलराज सुरू होतं? मला वाटतं लोक जंगलराज विसरतील आणि तेजस्वींच्या नेतृत्वात मंगलराज सुरू होईल" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याआधी काही दिवसांपूर्वी "तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची असते" असं राऊत यांनी म्हटलं होतं.
"तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची"
"बिहार विधानसभा निवडणुकीचं एकंदर चित्र पाहिलं तर उद्या तेजस्वी यादव बहुमताने बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण जनभावना महत्त्वाची असते. ती दाबता येत नाही" असं राऊत यांनी म्हटलं होतं. "ज्या मुलाच्या पाठीमागे सध्या पाठबळ नाही. त्याच्या घरातली माणसं तुरुंगात आहे. मग ती कोणत्याही कारणास्तव असो. त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे इन्कम टॅक्स, सीबीआयचा ससेमिरा लावला जात आहे. तोच तरुण मुलगा हजारो लाखोंच्या सभा घेतोय आणि केंद्रीय राजसत्तेला आव्हान निर्माण करतोय. मला वाटतं बिहारच्या निवडणुकीचं एकंदर चित्र पाहिलं तर उद्या तेजस्वी यादव बहुमताने बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण जनभावना महत्त्वाची असते. ती दाबता येत नाही" असं राऊत यांनी म्हटलं होतं.