पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू आहे. मात्र निकालांमध्ये घोळ घालण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलानं केला आहे. मतमोजणी आणि निकालात गडबड होतेय. जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रं दिली जात नाहीत. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप राजदकडून करण्यात आला आहे. महागठबंधनमधील सर्व पक्षांनी याबद्दलची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.'जवळपास १० जागांवर नितीश प्रशासन मतमोजणीस उशीर करत आहे. जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रं दिली जात नाहीत. मुख्यमंत्री निवासस्थानात बसून नितीश कुमार आणि सुशील मोदी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून सर्व डीए आणि आरओंना फोन करत आहेत. अटीतटीच्या लढतीत आमच्या बाजूनं निकाल द्या, यासाठी त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे,' असा आरोप राजदनं ट्विट करून केला आहे. 'नितीश कुमार, सुशील मोदी मुख्यमंत्री निवासस्थानात बसून सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. महागठबंधनला कोणत्याही परिस्थितीत १०५-११० जागांवर रोखण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जनमताची लूट होऊ देणार नाही,' असं राजदनं दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.राजद नेते मनोज झा यांनीदेखील नितीश सरकारवर निशाणा साधला आहे. 'निकाल बदलले जात आहेत. महाराजगंज, त्रिवेणीगंज, कटिहार यासारख्या अनेक जागांवर प्रमाणपत्रं दिली जात नाहीएत. मतमोजणी लांबवण्यासाठी चालढकल सुरू आहे,' असा आरोप झा यांनी केला. नितीश कुमार आता अवघे काही तास मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांनी स्वत:वर आणखी शितोंडे उडवून घेऊ नयेत, असंदेखील झा यांनी म्हटलं आहे.