Bihar Assembly Election Results: २, १२ अन् १६... बिहारमध्ये टफ फाईट; ३० जागांमुळे वातावरण टाईट
By कुणाल गवाणकर | Published: November 10, 2020 07:27 PM2020-11-10T19:27:10+5:302020-11-10T19:33:31+5:30
Bihar Assembly Election Results: निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या २९ जागांकडे सर्वांचं लक्ष
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार हे अद्यापही स्पष्ट होताना दिसत नाही. सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच सुसाट सुटलेल्या महागठबंधनची नंतर पिछेहाट सुरू झाली. आधी क्रमांक एकवर दिसत असलेला राष्ट्रीय जनता दल नंतर मागे मागे येऊ लागला. मग भारतीय जनता पक्षानं जोरदार मुसंडी मारली. आता पुन्हा एकदा राजदनं भाजपला मागे टाकलं आहे. त्यामुळे बिहारमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे.
फासा पलटला! भाजपाला राजदने टाकले मागे; 14 जागांचाच निकाल हाती
सध्याच्या घडीला २४३ जागांपैकी ३१ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. पैकी १० जागा भाजपनं खिशात घातल्या आहेत. तर राजदनं ८ ठिकाणी विजय मिळवला आहे. जेडीयूनं ६, तर काँग्रेसनं २ जागा मिळवल्या आहेत. जिंकलेल्या जागा आणि सध्याची आघाडी विचारात घेतल्यास भाजपला ७२ जागा मिळू शकतात. तर राजदला ७६, जेडीयूला ४१, तर काँग्रेसला २० जागांवर यश मिळू शकतं. सध्या एनडीए १२०, तर महागठबंधन ११५ जागांवर पुढे आहेत. बिहारच्या विधानसभेत जादुई आकडा १२२ आहे. त्यामुळे बिहारमध्ये प्रचंड मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
बिहारमधील भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय? शरद पवारांचा मिश्किल टोला; म्हणाले...
कोरोना संकटामुळे मतमोजणी करताना निवडणूक आयोगाला अडचणी येत आहेत. एका मतमोजणी केंद्रावर कर्मचारी काही अंतरावर बसले असल्यानं निकाल लागण्यास उशीर होत आहे. त्यातच २९ जागांवर एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर आहे. यातल्या २ मतदारसंघांमध्ये पहिल्या दोन उमेदवारांमधील मतांचं अंतर १०० पेक्षाही कमी आहे. राज्यातल्या १२ मतदारसंघांमध्ये पहिल्या दोन उमेदवारांमधील मताधिक्य ५०० हून कमी असल्याचं जोरदार चुरस आहे. तर १६ मतदारसंघांमध्ये पहिल्या दोन उमेदवारांना आतापर्यंत मिळालेल्या मतांमध्ये १००० पेक्षा कमी अंतर आहे. त्यामुळे या ३० मतदारसंघांचे निकाल थेट राज्याच्या निकालांवर परिणाम करू शकतात.