चंपारण : बिहार विधानसभा निवडणुसाठी आज पहिल्या टप्पात मतदान होत आहे. यातच दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकींसाठी प्रचार सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, स्टार प्रचारक म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी यांनी पश्चिम चंपारणमध्ये मोर्चा काढून महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर राहुल गांधींनी निशाणा साधला.
एनडीएच्या नेत्यांवर खोटे बोलण्याचा आरोप करत आमच्यात अशी एक कमी आहे की, आम्ही खोटे बोलून त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी रॅलीत स्टेजच्या समोर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पकोडे तळण्याविषयी त्यांना आठवण करून दिली. यावर राहुल गांधी यांनी आपले भाषण थांबवले आणि तुम्ही पकोडे बनविले आहेत का? असा सवाल त्या व्यक्तीला केला. तसेच, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार पुढील वेळी आले की त्यांना पकोडे खायला घाला, असे राहुल गांधींनी सांगितले.
याआधी राहुल गांधी यांनी रोजगारापासून ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, लॉकडाऊन दरम्यान कामगारांच्या परिस्थितीवरूनही सरकारला घेरले. नरेंद्र मोदींनी कामगारांना पायी चालवले आहे, राहुल गांधी म्हणाले. तसेच, कृषी कायद्याला शेतकऱ्यांच्या विरोधाचा संदर्भ देताना राहुल गांधी म्हणाले की, पंजाबमध्ये दसर्यानिमित्त रावणाच्या जागी पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्यात आला आहे. हे पाहून मला वाईट वाटले, कारण पंतप्रधानांचा पुतळा असा जाळू नये. मात्र, शेतकऱ्यांनी दु: खी असल्यामुळे असे केले."