पटना : बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी आज बिहारमधील लोक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. या टप्प्यात अनेक बड्या मंत्र्यांचे आणि नेत्यांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. दरम्यान, भाजपाचे उमेदवार आणि नितीश सरकारमधील मंत्री. डॉ प्रेम कुमार आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाच्या चित्राचा मास्क परिधान करत मतदान केंद्रावर दाखल झाले. यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भाजपाचे उमेदवार प्रेम कुमार यांच्या गया शहर मतदारसंघातही आज मतदान होत आहे. प्रेम कुमार सकाळी मतदान करण्यासाठी देण्यासाठी बाहेर गेले. प्रेम कुमार हे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु ते मतदान करण्यासाठी सायकलवरून मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी प्रेम कुमार यांनी परिधान केलेल्या मास्कवर भाजपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचे चित्र होते. तेच मास्क परिधान करून प्रेम कुमार मतदान केंद्रावर पोहोचले होते.
कमळ चिन्ह असलेले मास्क परिधान केल्यामुळे प्रेम कुमार यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर प्रेम कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, "मास्क परिधान करणे आवश्यक असल्यामुळे वापरले. ज्या मास्कचा आम्ही वापर करत होतो, त्याचाच वापर इथेही झाला. मतदान केंद्राच्या ठिकाणी दुसऱ्या मास्कची व्यवस्था नव्हती. त्यामुळे माझ्याजवळ जे मास्क होते, तेच वापरून मी गेलो. मी काही हे जाणून बुजून केले नाही. फक्त सुरक्षेच्या कारणास्तव हे मास्क परिधान केले होते"
दरम्यान, कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर निवडणूक आयोगाने दिशानिर्देश आधीच जारी केलेले आहेत. या निर्देशानुसार, कोरोना क्वारंटाईन मतदारांना शेवटच्या तासात मतदानाची सुविधा दिली जाईल. तसेच मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज यांचा वापर करणे आवश्यक असेल. मतदानासाठी एक तासाची वेळ वाढवून देण्यात आली आहे. ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. या निवडणुकीसाठी ७ लाख हँड सॅनिटायझर, ४६ लाख हून अधिक मास्क, ६ लाक पीपीई कीटस, ७.६ लाख बोडशीट, २३ लाख हँड ग्लोव्ह्ज यांची तयारी करण्यात आली आहे.
तीन टप्प्यात मतदान होणारबिहार विधानसभा निवडणूक २०२० साठी होणाऱ्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील ७१ मतदारसंघात मतदान समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात १७ जिल्ह्यातील ९४ मतदारसंघांचा तर तिसऱ्या टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांचा समावेश आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे १९ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.