मोकामा – बिहारच्या राजकारणात तुम्ही अनेक बाहुबली नेत्यांबद्दल ऐकलं आहे. बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपट यूपी, बिहारच्या राजकारणावर पाहिले असतील, पण प्रत्यक्षात आम्ही तुम्हाला अशा नेत्यांबद्दल सांगत ज्याला मोकामा जिल्ह्यात छोटे सरकार म्हणून ओळखलं जातं, त्यांचे नाव अनंत सिंह, जे पाचव्यांदा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरले आहेत.
या परिसरातील लोक अनंत सिंह यांना 'छोटे सरकार' म्हणून ओळखतात. यंदा 'छोटे सरकार' यांना बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडीकडून तिकीट मिळाले आहे. तुरूंगात असलेले मोकामाचे हे बाहुबली आमदार कैदी व्हॅनमधून अर्ज भरण्यासाठी उपविभाग मुख्यालयात पोहोचले. अनंत सिंह यांची तुरूंगातून निवडणूक लढवण्याची ही पहिली वेळ नाही. गंगा नदीच्या काठावरील मोकामा शहराबद्दल बोलताना तेथील लोकांच्या ओठांवर पहिले नाव येतं ते अनंत सिंह
अपक्ष आमदार अनंत सिंह यावेळी आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत. मागील निवडणुकीत आरजेडीने अनंत सिंहच्या गुन्हेगारीचा इतिहास हा मुद्दा बनविला होता, परंतु राजकीय परिस्थिती बदलली अन् आरजेडी यावेळच्या निवडणुकीत थेट अनंत सिंह यांनाच उमेदवारी दिली. २०१५ मध्ये अनंत सिंह यांनी अपक्ष उमेदवार म्हणून महाआघाडीचे उमेदवार नीरज कुमारचा पराभव केला.
अनंत सिंह हे मागील ४ वेळेपासून मोकामा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत, २००५ मध्ये दोन वेळा आणि २०१० मध्ये त्यांनी जेडीयूच्या तिकिटावर निवडणुका जिंकल्या. २०१५ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि जिंकून आले. अनंत सिंह सध्या तुरूंगात आहेत, बेकायदेशीर एके-४७ रायफल बाळगल्याप्रकरणी ते तुरुंगात आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अनंत सिंहचा नातेवाईक दोन एके-४७ रायफलसह दिसला होता. नंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर धाड टाकून एके-रायफल जप्त करत त्यांना अटक केली. या प्रकरणात अनंत सिंहने आत्मसमर्पण केले, सध्या ते पाटण्यातील बौर जेलमध्ये आहेत.
अनंत सिंह कसे बनले छोटे सरकार?
असं सांगितलं जातं की, बिहारच्या बाढ भागात राजपूत आणि भूमिहारांचा रक्तरंजित इतिहास आहे. रात्री घराबाहेर पडण्यासही लोक घाबरत होते. अशा परिस्थितीत अनंत सिंह भूमिहार समुदायाचा रक्षक म्हणून उदयास आले. २००५ साली मोकामा विधानसभा मधून नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड तिकिटवर उभे राहिल्यानंतर त्यांचे नशीब पालटले, अनंत सिंह यांना तिकीट मिळाल्यानंतर त्याच्या गुन्हेगारीच्या इतिहासाबद्दल बरीच चर्चा झाली असे असूनही, मोकामा विधानसभा मतदारसंघातून अनंत सिंह विजयी झाले.
आमदार झाल्यानंतर रमजानच्या दिवसात इफ्तार, रोजगारासाठी गरिबांना मदत, त्याच्या घरी लोकांची गर्दी होऊ लागली. त्याने स्वत: लोकांचे प्रश्न सोडविण्यास सुरुवात केली, ज्यामुळे संपूर्ण परिसरातील गरिबांचा मशीहा म्हणून त्यांची प्रतिमा बनली आणि लोकांसाठी ते छोटे सरकार झाले.