पाटणा – कोरोना महामारीच्या संकटात बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपा जेडीयू याठिकाणी एकत्र निवडणूक लढवत आहेत. भाजपाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा घोषित केला असून यात मुख्य म्हणजे कोरोनाचा महामारीचाही उल्लेख करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पाटण्यात भाजपाने संकल्प पत्र प्रसिद्ध केलं आहे.
या जाहीरनाम्यात भाजपाने ११ मोठे संकल्प केले आणि सत्तेत आल्यानंतर अनेक आश्वासने पूर्ण करण्याचा दावा केला. “भाजपा है तो भरोसा है’ ५ सूत्रे, एक लक्ष्य, ११ संकल्प' यासह भाजपाने नवीन नाराही दिला आहे. पाटण्यात जाहीरनामा जाहीर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भाजप नेते भूपेंद्र यादव आणि इतर नेत्यांनी पत्रकार परिषदेत भाषण केले. निर्मला सीतारामन यांनी माध्यमांना सांगितले की, कोरोना लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत मास्क हाच उपाय आहे. परंतु ही लस येताच ती मोठ्या प्रमाणात भारतात तयार होईल. ही लस बिहारच्या लोकांना मोफत दिली जाईल असं आश्वासन भाजपानं दिलं आहे.
भाजपाच्या जाहिरनाम्यातील ११ मुख्य संकल्प
१. बिहारच्या प्रत्येक रहिवाशांना कोरोनाची लस मोफत देणार.
२. वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर तांत्रिक शिक्षण हिंदी भाषेत उपलब्ध करुन देणे.
३. एका वर्षात संपूर्ण राज्यात तीन लाख नवीन शिक्षकांची भरती होईल.
४. पुढील पिढीसाठी आयटी हब येथे पाच वर्षात पाच लाख रोजगार निर्मिती.
५. एक कोटी महिला स्वावलंबी बनवणार.
६. आरोग्य विभागात एक लाख लोकांना नोकर्या मिळतील तसेच २०२४ पर्यंत दरभंगा एम्स सुरू करणार
७. धान आणि गहू नंतर डाळींची खरेदीही एमएसपी दराने केली जाईल.
८. २०२२ पर्यंत ३० लाख लोकांना पक्के घर देण्याचं आश्वासन.
९. २ वर्षात १५ नवीन प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याचे वचन.
१०. गोड्या पाण्यातील माशांचे उत्पादन वाढवणार
११. शेतकरी उत्पादक संघटनेची पुरवठा साखळी तयार करणार, ज्यामुळे १० लाख रोजगार निर्माण होतील.
यावेळी निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जनतेने एनडीएला मोठ्या प्रमाणात मतदान करुन जिंकून द्यावं, नितीशकुमार पुढील ५ वर्षे बिहारचे मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या राजवटीत बिहार हे भारताचे प्रगतशील आणि विकसित राज्य बनले आहे. मोदी सरकारने घरात मोफत गॅस सिलिंडर वितरित केले. गरीब लोकांसाठी बँकेत खाते उघडले आणि कोरोना कालावधीत प्रत्येक गरीबांना दीड हजारांची आर्थिक मदत दिली. बिहार हे असं राज्य आहे जेथे सर्व नागरिक राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि सुज्ञ आहेत. पक्षाने दिलेली आश्वासने त्यांना ठाऊक व समजली आहेत. जर कोणी आमच्या जाहीरनाम्यावर प्रश्न विचारत असेल तर आम्ही जे वचन दिले होते ते पूर्ण करतोच, आत्मविश्वासाने त्यांना उत्तर देऊ शकतो असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.