नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे, बिहारमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि प्रचंड लोकप्रियता असूनही भाजपा नेतृत्व बिहारबद्दल चिंतेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष जेडीयूच्या नितीश कुमार यांची लोकप्रियतेचा आलेख घसरत असल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.
लॉकडाऊन दरम्यान प्रवासी मजुरांना हाताळण्यात अपयश, पूर आणि कोरोना महामारीचा सामना करण्यात नितीश कुमार सरकार अपयशी ठरलं आहे. बिहारमध्ये एनडीए निवडणूक हरली तर भाजपाला येणाऱ्या काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नितीश कुमार यांच्या घसरत्या लोकप्रियतेबाबत भाजपाला माहिती नाही असं नव्हे, आरएसएस आणि भाजपाने केलेल्या सर्व अंतर्गत सर्वेक्षणांमध्ये हे स्पष्ट झालं होतं की बिहारमधील लोक आता नितीशकुमारांना पसंत करत नाहीत.
मोदी लाट पाहता बिहारमधील स्थानिक नेत्यांनी राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या नेत्यांची मागणी पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जून-जुलैमध्ये बिहारमधील अनेक नेत्यांसोबत चर्चा केली होती. या चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला की नितीश यांना सोडणे पक्षासाठी घातक होऊ शकतं. कारण नितीशकुमार हे लालू यादव यांचा पक्ष आरजेडी, कॉंग्रेस आणि डाव्या आघाडीत सामील होण्याचा धोका होता, म्हणून हायकमांडने नितीशसमवेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. इतकचं नाही तर नितीशकुमार यांच्या विरोधी लाटेला ब्रेक लावण्यासाठी चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी पर्याय म्हणून उभी राहिली. चिराग पासवान हे नितीशविरोधी मतांना आरजेडी-कॉंग्रेस-डाव्या आघाडीत जाण्यापासून रोखतील या आशेने राजकारण केले गेले.
निवडणुकीचा प्रचाराला जसजसा वेग आला तसं नितीशकुमार यांच्या जेडीयूची लोकप्रियता घटत गेली. दुसरीकडे कोरोनानं भाजपाच्या अनेक नेत्यांना जाळ्यात ओढलं, सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस, सुशील मोदी, मंगल पांडे, राजीव प्रताप रुडी, शाहनवाज हुसेन आणि अन्य नेत्यांना कोरोनाची लागण झाली. अमित शहा अद्यापही बिहारमध्ये सक्रिय नाहीत. निवडणुकीचा पहिला टप्पा महायुतीच्या बाजूने गेला आहे तर दुसर्या टप्प्यातील एनडीएला दिलासा मिळताना दिसत आहे. या आठवड्यात भाजपा नेते बिहारमधील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेईल.