Bihar Election 2020: बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होण्याची चाहूल; नितीश यांचं ठाकरेंच्या पावलावर पाऊल?
By कुणाल गवाणकर | Published: October 28, 2020 10:57 AM2020-10-28T10:57:47+5:302020-10-29T12:48:18+5:30
Bihar Election 2020: लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांचा मुख्यमंत्री नितीश कुमारांवर हल्लाबोल
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे. विधानसभेच्या ७१ जागांसाठी मतदान होत आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दल, भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस असा मुकाबला होत आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानं वेगळीच खेळी केल्यानं निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे निकालानंतर नेमक्या काय घडामोडी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लोकजनशक्ती पक्षानं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाविरुद्ध उघड भूमिका घेतली आहे. लोकजनशक्ती पक्षानं संयुक्त जनता दलाविरुद्ध उमेदवार उभे केले आहेत. मात्र भाजपविरुद्ध उमेदवार दिलेले नाहीत. लोकजनशक्ती पक्षाच्या या भूमिकेचा संयुक्त जनता दलाला फटका बसण्याची शक्यता आहे. तर भाजपला यामुळे फायदा होईल. त्यातच आता चिराग पासवान यांनी नितीश कुमारांवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाच्या संपर्कात आहेत आणि ते निकालानंतर महाआघाडीसोबत जातील, असा गंभीर आरोप पासवान यांनी केला आहे.
वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिराग पासवान यांची प्रॅक्टिस; "तो" Video व्हायरल
'नितीश कुमारांच्या पक्षाला मतदान केल्यास बिहार उद्ध्वस्त होईल. नितीश सतत राजदच्या संपर्कात आहेत. तेजस्वी यादव आणि नितीश कुमार एकच आहेत. यंदा आमचा पक्ष संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागांवर लढत आहे आणि आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जागा जिंकू,' असा विश्वास पासवान यांनी व्यक्त केला. 'नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली बिहारची अवस्था अतिशय बिकट आहे. हीच परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही मतं मागत आहोत,' असं पासवान पुढे म्हणाले.
"नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले..."; तेजस्वी यादवांचा सणसणीत टोला
महाराष्ट्राची पुनरावृत्ती होणार?
चिराग पासवान यांचा आरोप खरा ठरल्यास बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होईल. राज्यात शिवसेना आणि भाजपनं युती करून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं. पण भाजप मुख्यमंत्रिपद देण्याचं वचन पाळत नसल्याचा आरोप करत शिवसेनेनं भाजपशी फारकत घेत काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला. यानंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती?
बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप यांची युती आहे. तर त्यांच्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी मैदानात आहे. निवडणूक निकालानंतर नितीश कुमार भाजपचा विश्वालघात करून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत जातील, असा चिराग पासवान यांचा दावा आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये संयुक्त जनता दलानं राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबतच निवडणूक लढवली. पण काही महिन्यांनी त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपसोबत घरोबा केला.