नवी दिल्ली - बिहारमध्ये मंगळवारी (3 नोव्हेंबर) दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "तुम्ही माझ्याकडून लिहून घेऊ शकता की नितीश कुमार 10 नोव्हेंबरनंतर पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत. माझी यात काहीच भूमिका नसेल, मला फक्त बिहार प्रथम, बिहारी प्रथम एवढंच हवं आहे. मला हवं आहे की बिहारमधील चार लाख नागरिकांच्या सूचनेनुसार तयार केल्या गेलेल्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार काम केले जावे" असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.
चिराग पासवान यांनी ट्विटरवरून देखील नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे. बिहारमधील जनतेला मतदानासाठी आवाहन केले. बिहार1stबिहारी1st आणि असंभव नितीश या हॅशटॅगचा वापर करत त्यांनी ट्विट केले आहे. 'बिहारच्या समस्त जनतेला आवाहन आहे की, स्वतःवर गर्व करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावा. येणाऱ्या सरकारमध्ये बिहारमध्ये बदल झालेला दिसायला हवा. काही कामं झाली पाहिजेत' असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.
"प्रत्येकजण आता मृत व्यक्तीवरून राजकारण करतंय, त्यांना स्वतःची लाज वाटायला हवी"
माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूवर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जीतनराम मांझी यांच्या HAM पक्षाने या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. HAM चे प्रवक्ते डॉ. दानिश रिजवान यांनी या प्रकरणात एलजीपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर संशय घेतला आहे. यानंतर आता चिराग पासवान यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
"एखाद्या मुलाबद्दल जे लोक अशाप्रकारची विधानं करताहेत, त्यांना स्वतःची लाज वाटायला हवी. मी मांझी यांना फोनद्वारे माझ्या वडिलांच्या गंभीर प्रकृतीबाबत माहिती दिली होती. मात्र तरी देखील ते माझ्या वडिलांना पाहण्यासाठी आले नाही. आता ज्या प्रकारे मांझी माझ्या वडिलांबद्दल बोलत आहेत. रुग्णालयात असताना त्यांनी इतकी काळजी का नाही दाखवली? प्रत्येकजण आता मृत व्यक्तीवरून राजकारण करत आहे. ते जिवंत असताना त्यांची भेट घेण्यासाठी का कोणी कष्ट घेतले नाहीत?"असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.
"नितीश कुमार हे प्रचाराला विकासाच्या मुद्यावरून भरकटवण्यासाठी हे प्रश्न उपस्थित करताहेत"
चिराग पासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट देखील केले आहे. "नितीश कुमार हे प्रचाराला विकासाच्या मुद्यावरून भरकटवण्यासाठी माझ्या वडिलांच्या शेवटच्या दिवसांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. माझा आग्रह असेल की, पुढील सभेत जेव्हा पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद घेण्यासाठी जाल तेव्हा माझ्या वडिलांच्या शेवटच्या दिवसांबाबत नक्की विचारून घ्यावं. माझ्या वडिलांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मोदीजी त्यांच्या सोबत होते" असं पासवान यांनी म्हटलं आहे.