पाटणा: बिहारमधील निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली आहे. ७ नोव्हेंबरला तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान असून १० नोव्हेंबरला निकाल आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्ता कायम राखण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मित्रपक्ष भाजपनंही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांच्या सभांचं आयोजन करून बिहार पिंजून काढला आहे. संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्षासमोर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसनं आव्हान उभं केलं आहे.निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. पूर्णियामध्ये एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला विजयी करा. ज्याचा शेवट गोड, ते सगळंच गोड, असं कुमार म्हणाले. 'आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे. परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे,' असं कुमार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटलं. आमच्या उमेदवाराला विजयी कराल ना, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थितांना विचारला.
Bihar Election 2020: ही माझी अखेरची निवडणूक; प्रचारसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांची घोषणा
By कुणाल गवाणकर | Published: November 05, 2020 4:58 PM