पाटणा - बिहारमधीलनिवडणूक अखेरच्या टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्ता कायम राखण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मित्रपक्ष भाजपनंही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांच्या सभांचं आयोजन करून बिहार पिंजून काढला आहे. संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्षासमोर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसनं आव्हान उभं केलं आहे. पूर्णियामध्ये एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला विजयी करा. ज्याचा शेवट गोड, ते सगळंच गोड, असं कुमार म्हणाले. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी नितीश कुमारांना टोला लगावला आहे.
पी चिदंबरम यांनी 'नितीश कुमारांची निवृत्तीची घोषणा म्हणजे दया याचना' असल्याचं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. नितीश कुमारांच्या "ही माझी शेवटची निवडणूक आहे" या विधानावरून अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. "नितीश कुमार यांनी हे वक्तव्य करून विधानसभा निवडणुकीत आपला पराभव स्वीकारला आहे. ही आपली शेवटची निवडणूक' हे वक्तव्य म्हणजे अपयशावर दया याचना" असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
ही माझी अखेरची निवडणूक; प्रचारसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांची घोषणा
"निवडून आला तरी पहिल्याच दिवसापासून सुस्तावलेला असेल अशा एका अशा व्यक्तीला बिहारने मतं का द्यावीत?" असं देखील चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 'आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे. परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे,' असं नितीश कुमार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटलं होतं. आमच्या उमेदवाराला विजयी कराल ना, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थितांना विचारला होता.
नितीश कुमारांसाठी यंदाची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक
नितीश कुमार यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक आहे. भाजपसोबत निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या संयुक्त जनता दलासमोर राजद आणि काँग्रेसनं तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यातच केंद्रात एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षानं बिहारमध्ये एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकजनशक्ती पक्ष अगदी उघडपणे कुमार यांच्याविरोधात उतरला आहे. त्यांनी संयुक्त जनता पक्षाच्या उमेदवारांविरोधात सगळ्याच जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र भाजपच्या जागांवर उमेदवार दिलेले नाहीत. त्यामुळे जनता दलाच्या अडचणी वाढल्या आहेत.
"कोण कोणाला देशाबाहेर काढणार?, कोणामध्ये इतका दम नाही", नितीश कुमारांचा सणसणीत टोला
नितीश कुमार यांनी एका सभेदरम्यान त्यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्यांना टोला लगावला आहे. "कोण कोणाला देशाबाहेर काढणार?, कोणामध्ये इतका दम नाही" असं म्हणत नितीश कुमारांचा सणसणीत टोला लगावला आहे. बिहारमधील एका सभेत जनतेला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. नितीश कुमार यांची किशनगंजमध्ये एक सभा झाली. "हा चुकीचा प्रचार कोण करत आहे. उगाच बडबड करत असतात. कोण कोणाला देशाबाहेर काढणार? सर्व भारताचे नागरिक आहेत. कोणामध्ये दम नाही की आपल्या माणसांना देशाबाहेर काढू शकेल. कोण बाहेर काढणार आहे? हे असं कसं बोलत राहतात. जेव्हापासून जनतेने संधी दिली, तेव्हापासून समाजात प्रेम, बंधूभाव आणि सद्भावनापूर्ण वातावरण निर्माण केलं. सर्वांना एकजूट करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही काम करत राहतो. समाजात वाद चालूच राहावेत अशी काही लोकांची इच्छा आहे."