Bihar Election 2020: बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती नाही; राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 06:50 IST2020-10-14T02:13:18+5:302020-10-14T06:50:20+5:30
प्रफुल पटेल; शिवसेनेशी युतीबाबत मौन

Bihar Election 2020: बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती नाही; राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांना दिली. शिवसेना आणि राष्ट्रवादी बिहारच्या जागा एकत्रित लढवणार याविषयी चर्चा सुरू असताना अद्याप यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस आणि राजदसोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, वरिष्ठ नेते अहमद पटेल, तसेच राजदचे तेजस्वी यादव यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. पण एकत्र लढण्याची काँग्रेसची मानसिकता दिसली नाही. त्यामुळे आता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे प्रफुल पटेल म्हणाले.
शिवसेना ४० जागा लढणार
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना ४० ते ५० जागा लढविणार असून कोणासोबत आघाडी करणायची हे अजून ठरलेले नाही,असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सांगितले. पप्पू यादव यांनी एकत्र लढण्याचा प्रस्ताव दिला असल्याचेही राऊत म्हणाले.