मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून, त्यात शिवसेनेने २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची नावे आहेत. बिहार निवडणुकीत शिवसेना ५० जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.
नियमानुसार शिवसेनेने ही यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची नावे
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- आदित्य ठाकरे
- सुभाष देसाई
- संजय राऊत
- चंद्रकांत खैरे
- अनिल देसाई
- विनायक राऊत
- अरविंद सावंत
- गुलाबराव पाटील
- राजकुमार बाफना
- प्रियंका चतुर्वेदी
- राहुल शेवाळे
- कृपाल तुमाणे
- सुनील चिटणीस
- योगराज शर्मा
- कौशलेंद्र शर्मा
- विनय शुक्ला
- गुलाबचंद दुबे
- अखिलेश तिवारी
- अशोक तिवारी
गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार
यापूर्वी बुधवारी शिवसेनेने माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा करण्याची घोषणा केली. तथापि, पांडे यांना ना बक्सर विधानसभेचे तिकीट मिळाले आहे ना वाल्मीकीनगर लोकसभा जागेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. बक्सरची जागा भाजपाच्या खात्यात गेली. जेडीयूची उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यात गुप्तेश्वर पांडे यांचे नाव नव्हते.
शिवसेनेला येत्या एक ते दोन दिवसांत निवडणूक चिन्ह मिळणार
शिवसेनेला बिहार विधानसभेची निवडणूक त्याच्या निवडणूक चिन्हावर अर्थात 'धनुष्यबाण' वर लढता येणार नाही. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी विधानसभेसाठी पक्षाला नवीन निवडणूक चिन्ह वाटप देण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. पुढील एक ते दोन दिवसांत हा निर्णय येणार आहे. याची पुष्टी शिवसेनेचे बिहार प्रदेश प्रमुख कौशलेंद्र शर्मा यांनी केली आहे.
शिवसेनेचे आयोगाला तीन पर्याय
शिवसेनेने निवडणूक आयोगाला तीन पर्याय दिले आहेत. यापैकी निवडणूक आयोगाला चिन्ह वाटप करेल. या निवडणुकीच्या चिन्हा शिवसेना बिहारमधील ५० विधानसभा जागांवर निवडणूक लढवेल, शर्मा म्हणाले की बिहारमधील सत्ताधारी पक्षाच्या जेडीयूच्या आक्षेपानंतर निवडणूक आयोगाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेचे निवडणूक चिन्ह जप्त केले.
सध्या नाही एकही जागा
बिहारमध्ये उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी खा.अनिल देसाई, खा.प्रियांका चतुर्वेदींवर आहे, असे सूत्रांनी सांगितले. २०१५ च्या निवडणुकीत सेनेने ८० जागा लढविल्या. एकही जागा जिंकली नव्हती. सेनेच्या सर्व उमेदवारांना मिळून २,११,१३१ मते मिळाली होती. पक्षाचे सात उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा भाजपा प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे बिहारच्या रणांगणात दोन मराठी नेते परस्परविरोधी आक्रमक होणार का? हे आगामी काळात कळेल.