मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाबिहार विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढणार असल्याची चर्चा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा. शरद पवार यांच्या सोमवारच्या ‘वर्षा’वरील भेटीत त्यावर चर्चा झाल्याचे समजते.
बिहारमध्ये काँग्रेसने आधीच त्यांची आघाडी जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयु आणि भाजपचे जागा वाटप झालेले आहे. मायावतींच्या बसपाने असादुद्दीन ओविसी यांच्या एमआयएमसोबत ‘वंचित’ आघाडी उभारली आहे. शिवसेना यापूर्वीच एनडीएतून बाहेर पडली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पवार-ठाकरे भेटीत यावर चर्चा झाल्याचे एका नेत्याने सांगितले.
राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर भाजप शिवसेना एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, ती बैठक भाजपचे दोन्ही खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे यांच्या संदर्भात होती. सरकारला धोका आहे असे चित्र भाजपकडून तयार केले जात आहे. कारण त्यांना त्यांचेच आमदार टिकवून ठेवायची चिंता आहे. बिहार निवडणुकीतून आमच्या एकत्र येण्याने त्यांना परस्पर उत्तर मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.