Video: “नितीश कुमारांना सन्मानानं निरोप देण्याची जनतेला संधी”; शिवसेना नेते संजय राऊतांचा चिमटा
By प्रविण मरगळे | Published: November 7, 2020 01:07 PM2020-11-07T13:07:12+5:302020-11-07T13:09:22+5:30
Bihar Assembly Election 2020, Shiv Sena Sanjay Raut, CM Nitish Kumar News: नितीश कुमार हे खूप मोठे नेते आहेत, त्यांनी आपला डाव खेळला आहे असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई – बिहारच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे, १० नोव्हेंबरला बिहारमध्ये कोणाचं सरकार येणार हे स्पष्ट होईल, मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर करत माझ्या पक्षाला विजयी करा असं भावनिक आवाहन बिहारी जनतेला जाहीर सभेतून केलं होतं, नितीश कुमारांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी चिमटा काढला आहे.
याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, नितीश कुमार हे खूप मोठे नेते आहेत, त्यांनी आपला डाव खेळला आहे. जर कोणी नेता म्हणत असेल ही माझी शेवटची निवडणूक आहे तर त्यांना सन्मानाने निरोप द्यायला हवा. बिहारची जनताही नितीश कुमारांना निरोप देण्याच्या संधीची वाट पाहत होती, या निवडणुकीत जनता नितीश कुमार यांना निवृत्त करेल असा टोला राऊतांनी लगावला आहे.
#WATCH | नीतीश जी बहुत बड़े नेता हैं। वो अपनी पारी खेल चुके हैं। अगर कोई नेता कहता है कि ये मेरा आखिरी चुनाव है तो उन्हें सम्मान के साथ विदाई देनी चाहिए। बिहार की जनता इस विदाई के मौके का इंतज़ार कर रही थी। इस चुनाव में जनता उनको रिटायर कर देगी: शिवसेना नेता संजय राउत pic.twitter.com/Ju2puHzSY7
— ANI_HindiNews (@AHindinews) November 7, 2020
काय म्हणाले होते नितीश कुमार?
ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला विजयी करा. ज्याचा शेवट गोड, ते सगळंच गोड, असं नितीश कुमार म्हणाले होते, तसेच.'आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे. मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे, आमच्या उमेदवाराला विजयी कराल ना, असा प्रश्नदेखील नितीश कुमारांनी जनतेला विचारला होता.
नितीश कुमारांना काँग्रेसचाही टोला
नितीश कुमार यांनी ही माझी शेवटची निवडणूक असं वक्तव्य करून विधानसभा निवडणुकीत आपला पराभव स्वीकारला आहे. ही आपली शेवटची निवडणूक' हे वक्तव्य म्हणजे अपयशावर दया याचना असा टोला माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी लगावला आहे.
नितीश कुमारांसाठी यंदाची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक
नितीश कुमार यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक आहे. भाजपसोबत निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या संयुक्त जनता दलासमोर राजद आणि काँग्रेसनं तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यातच केंद्रात एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षानं बिहारमध्ये एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकजनशक्ती पक्ष अगदी उघडपणे कुमार यांच्याविरोधात उतरला आहे. त्यांनी संयुक्त जनता पक्षाच्या उमेदवारांविरोधात सगळ्याच जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र भाजपच्या जागांवर उमेदवार दिलेले नाहीत. त्यामुळे जनता दलाच्या अडचणी वाढल्या आहेत.