पटना : बिहार विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजनी (Bihar election result) आता अत्यंत रोमांचक स्थितीत येऊन पोहोचले आहे. नितिशकुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणत निवडणूक लढविणाऱ्या भाजपाच्या सर्वाधिक जागा येण्याची शक्यता आहे. 243 जागांपैकी 7 जागांवर भाजपा, राजद 61, जेडीयू 52, काँग्रेस 22 आणि भाकपा-माले 13, व्हीआयपी सहा, एलजेपी 4 जागांवर आणि माकपा तीन जागांवर पुढे आहेत. अन्य पक्ष, अपक्षांना 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे जवळपास 47 जागांवर दोन उमेदवारांमध्ये 100 पेक्षा कमी मताधिक्याचे अंतर आहे.
नितिशकुमार गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी लालू प्रसाद यांच्या रादज, काँग्रेससोबत निवडणूक लढविली होती. काही महिने एकत्र सत्ता उपभोगल्यानंतर नितिशकुमार यांनी भाजपसोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली होती. एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु झाली होती.
लालू प्रसाद यांचे पूत्र तेजप्रताप हे देखील हसनपुर विधानसभा मतदारसंघातून केवळ 2500 मतांनी पुढे असून जेडीयू उमेदवाराकडून त्यांना कडवी झुंज मिळत आहे. महत्वाचे म्हणजे तिसऱ्या राऊंडपर्यंत तेजप्रताप मागे होते. तेजस्वी यादव यांनी त्यांच्या विजयासाठी प्रचारसभांचा धडाका लावला होता.तर नितिशकुमार यांचे सहा मंत्री पिछाडीवर आहेत. हिन्दुस्तानी अवाम मोर्चा-सेक्युलर (हम) चे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी हे इमामगंज मतदारसंघातून 2000 मतांनी पिछाडीवर आहेत.
भाजपाची ताकद वाढलीमागील निवडणुकीत एनडीएला १२५, राजद ८०, काँग्रेस २६, सीपीआय ३, एचएएम १, एमआयएम १, अपक्ष ५ असं संख्याबळ आहे. मागील निवडणुकीत जेडीयू आणि राजद यांनी एकत्रितपणे निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी राजदने सर्वाधिक जागा जिंकूनही नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, तर तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं होतं, मात्र काही काळातच जेडीयू आणि राजद सरकार कोसळलं आणि जेडीयूने भाजपाच्या साथीने राज्यात सत्तास्थापन केली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपाची ताकद बिहारमध्ये वाढताना दिसत आहे. भाजपा ६५ पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे तर जेडीयू ५१ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे एनडीएमध्ये भाजपा मोठा भाऊ बनत असल्याचं चित्र निकालाच्या कलावरून दिसत आहे.