नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत, भाजपा आणि जेडीयू आघाडीला बिहारमध्ये बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र या आघाडीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्याने जेडीयूही चिंतेत आहे. बिहारमध्ये भाजपाला ७० हून जास्त जागा मिळतील असं निकालांच्या कलमध्ये दिसत आहे. मात्र नितीश कुमार यांचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न भाजपाच्या भरवशावर आहे. कारण बिहारमध्ये जेडीयूपेक्षा भाजपाने जास्त जागा जिंकल्या आहेत.
बिहार निवडणुकीत जेडीयूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही, पहिल्यांदाच इतक्या वर्षापासून आघाडीत जेडीयूला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे आघाडीत भाजपा मोठा भाऊ झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या १५ वर्षापासून नितीश कुमार बिहारमध्ये सत्तेत आहेत, त्यामुळे सरकारविरोधी फटका जेडीयूला बसला असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. मात्र निवडणुकीच्या निकालामुळे मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांकडे राहणार का? सध्या या प्रश्नाची जोरदार चर्चा आहे.
भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला निवडणुकीत भाजपाने पुढे केले होते, संध्याकाळ पर्यंत बिहारमध्ये सरकार स्थापन करणे आणि नेतृत्वाबाबत निर्णय केला जाईल. मात्र त्यांच्या या विधानावरून भाजपा राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल फेरविचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमारांना दिलेले आश्वासन भाजपा पाळणार का? हे पाहणे गरजेचे आहे.
दुसरीकडे नितीशकुमार यांच्या टीमने निवडणुकीत जेडीयूच्या खराब कामगिरीबद्दल कोविड आणि चिराग पासवान यांना जबाबदार धरले. केंद्रातील भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या ३८ वर्षीय चिराग यांनी बिहारमधील संपूर्ण प्रचारादरम्यान नितीशकुमार यांना लक्ष्य केलं होतं, यासंदर्भात जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले की, चिराग पासवान यांना भाजपाने सुरुवातीपासून त्यांना वेगळे करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला हवं होतं. चिराग पासवान यांनी नितीश यांच्या व्होट बँकेला छेद दिला असा दावा जेडीयूचा आहे.
विशेष म्हणजे भाजपाचे समीक्षक आणि नितीशकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हेच वाटत आहे की, चिराग पासवान यांना भाजपाने बंडखोरी करण्यास सांगितले आहे किंवा नितीश कुमारांच्या जेडीयूला फटका देण्यासाठी भाजपानेही रणनीती खेळली आहे असा संशय व्यक्त केला जातो. अशा स्थितीत जुन्या मित्रपक्षांच्या भविष्याचा निर्णय भाजपाच्या हाती येईल.