पटना : बिहार निवडणुकीची मतमोजणी ऐन रंगात आलेली असतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना थेट दिल्लीतून गृहमंत्री अमित शहा यांनी फोन केला आहे. याचवेळी भाजपाचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि अमित शहांचे दूत नितीश कुमारांच्या निवासस्थानी पोहोचले असून गुप्त खलबते सुरु झाली आहेत.
जदयू-भाजपा आणि राजद-काँग्रेसच्या गोटात आताही मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जवळपास 10 ते 12 जागांवर 500 ते 100 मतांचे अंतर आहे. तर काही जागांवर एकेरी आकड्याचे मताधिक्य आहे. बिहारमध्ये अद्याप सव्वा कोटी मते मोजायची असून एडीएने मिळविलेली आघाडी कमी जास्त होण्याची आशा दोन्ही बाजुच्या नेत्यांना आहे. यामुळे पुढे काय करायचे याबाबतची रणनीती ठरविली जात आहे.
अमित शहांनी फोन केला तेव्हा भाजपाचे बिहार प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेश अध्यक्ष संजय जयस्वाल, केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्यासह उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी मुख्यमंत्री निवासस्थानी आले होते. या नेत्यांमध्ये निवडणूक निकाल काय येईल, यावर चर्चा झाल्याचे समजते. जदयूच्या वरिष्ठ नेत्यांपैकी दोघांनी अमित शहांनी फोन केल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. परंतू त्यांच्यात काय चर्चा झाली हे सांगण्यास नकार दिला. निवडणूक निकाल आणि सध्याचे ट्रेंड यावर चर्चा झाल्याचे या नेत्यांनी सांगितले.
निकाल मध्यरात्रीबिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत, मात्र अद्यापही निकालांच्या आकड्यात काहीही होऊ शकते अशी स्थिती आहे. याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यंदा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५ मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती पण यावेळी ५८ ठिकाणी मतदान केंद्रे होती असं डीईसी चंद्रभूषण यांनी सांगितले.
राजदचा भाजपाला धोबीपछाडदरम्यान, राजदने भाजपाचा सर्वात मोठ्या पक्षाचा खिताब काही काळासाठी का होईन काढून घेतला आहे. आजतकने दिलेल्या आकडेवारीनुसार एनडीए 123 तर राजद महाआघाडी 113 जागांवर आघाडीवर आहे. तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा 72, राजद 74, जदयू 43, काँग्रेस 20, सीपीआयएल 12 आणि इतर जागांवर अन्य पक्ष आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.