मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपाला ७४ तर जेडीयूला अवघ्या ४३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यानिवडणुकीत काँग्रेस-राजद महाआघाडीकडून तेजस्वी यादव यांनी एकाकी झुंज दिली, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राजदला ७५ जागा मिळाल्या तर काँग्रेस १९ जागांवर थांबली. बिहारच्या निकालावरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना टोलेबाजी करत आहेत.
बिहारच्या निकालात तेजस्वी यादव यांचं कौतुक करणाऱ्या शिवसेनेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी चांगलाच चिमटा काढला आहे. शेलारांनी ट्विट करून म्हटलंय की, भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत सलगी केलेलेल्या "जगंलराज का युवराज" ला बिहारच्या जनतेने नाकरले आता महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत "जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज" युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
तर काँगसने महाराष्ट्रात "हातात" "धनुष्यबाण" धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला, आता महाराष्ट्रात सुद्धा जनतेच्या "घड्याळाचे" काय सांगावे टायमिंग...? असं सूचक विधान करत पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच! त्यांच्यासह नितीश कुमार, देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलं आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने २२ उमेदवार उभे केले होते, या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झाले, बिहारमध्ये शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले, १ टक्केही मतदान शिवसेनेला झालं नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुमचा चमत्कार कुठे आहे? असा चिमटा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला काढला आहे.
बिहारमध्ये पुन्हा रालोआच; तेजस्वी यांना सर्वाधिक जागा
बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांना बहुमत मिळणार नाही, हे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले असून, या आघाडीलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पण भाजपला संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा मिळाल्याने नितीश पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा प्रश्न आहे. दुसरीकडे सर्वाधिक जागा तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने मिळविल्या असून, आमचेच सरकार येणार आणि बिहारमध्ये सत्तांतर होणार, असे राजदचे नेते ठामपणे सांगत आहेत.
शिवसेनेचा भाजपावर निशाणा
बिहारमधील निकाल हा लोकशाहीचा कौल आहे व तो मानावाच लागेल. तेजस्वी यादव पराभूत झाले असे मानायला आम्ही तयार नाही. निवडणूक हरणे हाच फक्त पराभव नसतो आणि जुगाड करून आकडा वाढवणे हा विजय नसतो. तेजस्वीची लढाई म्हणजे मोठा संघर्ष होता. हा संघर्ष कुटुंबातला होता तसा समोरच्या बलाढय़ सत्ताधाऱ्यांशी होता. तेजस्वीची कोंडी करण्याची व बदनामी करण्याची एकही संधी दिल्ली व पाटण्याच्या सत्ताधाऱयांनी सोडली नाही. ‘जंगलराजचे युवराज’ अशी निर्भत्सना पंतप्रधानांनी करूनही तेजस्वीने संयम ढळू दिला नाही व लोकांत जाऊन ते प्रचार करीत राहिले. नितीशकुमारांना पराभवाची चिंता एवढी वाटली की, ही माझी शेवटची निवडणूक असल्याच्या विनवण्या त्यांनी शेवटच्या टप्प्यात केल्या. तसे भावनिक आवाहन त्यांना करावे लागलं. नितीशकुमारांच्या पक्षास कमी जागा मिळाल्या तरी तेच मुख्यमंत्री होतील, असे अमित शहा यांना जाहीर करावे लागले. तसा शब्द तर २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेलाही दिला होता. तो शब्द पाळला गेला नाही व महाराष्ट्रात नवे राजकीय महाभारत घडले. आता कमी जागा मिळूनही नितीशकुमारांना दिलेला शब्द पाळला गेला तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल. बिहारात नेमके काय होईल? ते पुढच्या ७२ तासांत स्पष्ट होईल असं शिवसेनेनं म्हटलं आहे.