पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आता हळूहळू स्पष्ट होत आहे. बिहारच्या निकालांमध्ये एनडीए आणि महाआघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये १२२ जागांचा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी एनडीए आणि महाआघाडीत स्पर्धा लागली आहे. सध्याच्या घडीला एनडीएकडे ११८ जागा तर महाआघाडीकडे ११५ जागांची आघाडी आहे.
बिहार विधानसभा निकालांमध्ये भाजपा आणि जेडीयू आघाडीत भाजपाला ६३ जागा तर जेडीयू ५० जागांच्या आघाडीवर आहे, मुख्यत: नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध करत एनडीएतून बाहेर पडणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीला ७-८ जागांची आघाडी मिळाली आहे. तर राजद ८० आणि काँग्रेस २२ आणि इतर २२ अशी जागांची आघाडी आहे. सुरुवातीच्या कलानुसार महाआघाडीने जोरदार मुसंडी मारली होती, मात्र त्यानंतर एनडीएने जोर धरला.
लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी नितीश कुमारांना विरोध केला, मात्र भाजपासोबत आपण कायम असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे बिहारमध्ये एनडीएत भाजपाला जास्त जागा मिळाल्या आणि बहुमतासाठी काही मोजक्या जागांची गरज भासल्यास लोकजनशक्ती पार्टी एनडीएच्या बाजूने जाऊ शकते, परंतु एलजेपी नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनू देणार का? हा खरा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत भाजपाला पाठिंबा देत मुख्यमंत्रिपद भाजपाला मिळण्याचीही चर्चा रंगली आहे. पण निवडणुकीआधी कोणत्याही स्थितीत नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील हे भाजपा नेत्यांचे वक्तव्य कितपत खरं ठरेल हे आगामी काळात स्पष्ट होईल.
मागील निवडणुकीत एनडीएला १२५, राजद ८०, काँग्रेस २६, सीपीआय ३, एचएएम १, एमआयएम १, अपक्ष ५ असं संख्याबळ आहे. मागील निवडणुकीत जेडीयू आणि राजद यांनी एकत्रितपणे निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी राजदने सर्वाधिक जागा जिंकूनही नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, तर तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं होतं, मात्र काही काळातच जेडीयू आणि राजद सरकार कोसळलं आणि जेडीयूने भाजपाच्या साथीने राज्यात सत्तास्थापन केली होती.
मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपाची ताकद बिहारमध्ये वाढताना दिसत आहे. भाजपा ६५ पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे तर जेडीयू ५१ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे एनडीएमध्ये भाजपा मोठा भाऊ बनत असल्याचं चित्र निकालाच्या कलावरून दिसत आहे.