नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत, मात्र अद्यापही निकालांच्या आकड्यात काहीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. बिहारमध्ये एनडीएला १३० जागांची आघाडी मिळाली आहे तर महाआघाडीला १०२ जागांवर आघाडी आहे. यात भाजपाला सर्वाधिक ७४ जागांवर आघाडी मिळाली आहे तर त्यापाठोपाठ ६५ जागांवर तेजस्वी यादव यांच्या राजद पक्षाला आघाडी आहे.
याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यंदा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५ मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती पण यावेळी ५८ ठिकाणी मतदान केंद्रे होती असं डीईसी चंद्रभूषण यांनी सांगितले.
तर यावेळी सुमारे ४.१० कोटी लोकांनी मतदान केले आहे. आतापर्यंत १ कोटींहून अधिक मतमोजणी झाली आहे. यापूर्वी २५-२६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत होती, यावेळी किमान ३५ फेऱ्या मतमोजणी होण्याची शक्यता आहे. यामुळे रात्री उशीरापर्यंत मतमोजणी चालू राहू शकते असं बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एचआर श्रीनिवास यांनी सांगितले आहे.
निवडणूक आयोगाचा अंदाज आहे की, मतमोजणी १९ ते ५१ फेऱ्यात होऊ शकतात, हे मतदानाच्या मोजणीवर अवलंबून असेल. आयोगाने अंदाजे ३५ फेऱ्यांचा अंदाज लावला आहे. काही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी १९ फेऱ्यांमध्ये संपू शकते तर काहींमध्ये ५१ फेऱ्यांपर्यंत मतमोजणी जाऊ शकते. तसेच काँग्रेसने केलेल्या आरोपावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. आयोगाने पुन्हा एकदा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर भाष्य केले आणि म्हटले की, ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यात छेडछाड करता येणार नाही असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला.
काँग्रेसने घेतली ईव्हीएमवर शंका
महाविकास आघाडी पिछाडीवर पडत असल्याचा कल समोर आल्यानंतर काँग्रेस नेते उदित राज यांनी ट्विट करत ईव्हीएमवर शंका घेतली ते म्हणाले. जर मंगळ ग्रह आणि चंद्रावर जाणाऱ्या उपग्रहाची दिशा पृथ्वीवरून नियंत्रित करता येत असेल तर ईव्हीएम हॅक का करता येणार नाही? अमेरिकेत जर ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान झालं असतं तर ट्रम्प पराभूत झाले असते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बिहारमधील मतमोजणीच्या सध्याच्या कलांमध्ये एनडीए १३० जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ही १०० ते १०५ जागांवर आघाडीवर आहे. पक्षवार विचार केल्यास निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा ७२, जनता दल युनायटेड ४८, राष्ट्रीय जनता दल ६५, काँग्रेस २१ आणि लोकजनशक्ती पार्टी २ जागांवर आघाडीवर आहे. तर डावे पक्ष १९ जागांवर आघाडीवर आहे.