मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विविध स्तरातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बिहारच्या निवडणुकीत बलाढ्य शक्तींना एकाकी झुंज देणाऱ्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाचं अनेकजण कौतुक करत आहेत. बिहारच्या निकालावर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनीही भाष्य केलं आहे. यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक करत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले की, बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत आणि त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिलीय. ही लढाई अजून संपली नाही, पण भाजपा ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच यातून बोध घेऊन नितीश कुमार हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पाहावं लागेल. तसंच कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतमोजणीत गडबड होणार नाही याची दक्षता घेऊन आपण स्वायत्त असल्याचं निवडणूक आयोग दाखवेल, असा विश्वास आहे आणि प्रशासनानेही आयोगाला साथ द्यावी असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
"देशातील ११ राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपाला मोठं यश"
"मी बिहारमधील भाजपाच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. संपूर्ण बिहारने कोरोना काळात देखील उत्साहाने निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला आणि संपूर्ण जगाला एक आदर्श घालून दिला. या यशस्वी निवडणुकीसाठी मी निवडणूक आयोगाचेही आभार मानतो. देशातील ११ राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपाने मोठं यश मिळवलं आहे. बिहारबरोबरच या राज्यांमध्ये जनतेने भाजपाला मिळालेला कौल हा मोदींवरील विश्वासाचे प्रतिक आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणाबरोबरच अन्य राज्यातील आमच्या भाजपा कार्यकर्त्यांचेही मी अभिनंदन करतो. या सर्व निवडणुकींमधील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी जे मार्गदर्शन केलं, जे कष्ट घेतले त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
२० वर्षांनी भाजपा मोठा भाऊ, दबदबा वाढणार
बिहारमध्ये मतदारांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला सलग चौथ्यांदा पसंती दर्शवली असली तरी २० वर्षांनंतर प्रथमच भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गेल्यावेळी भाजपला ५३ जागा मिळाल्या होत्या. आतापर्यंतच्या बिहारी राजकारणात रालोआमध्ये नितीशकुमार यांचे वर्चस्व होते. जदयुला सतत मिळत असलेल्या अधिक जागा, हे त्याचे कारण होते. त्यामुळे भाजपनेही लहान भावाची भूमिका स्वीकारली होती. परंतु आता भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने तेथील गणिते बदलू शकतात. २० वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजप आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपाच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपाला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या २० वर्षांतील चित्र पाहणे उद्बोधक ठरेल.