मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, मात्र यात जेडीयूपेक्षा भाजपाला सर्वाधित ७५ पेक्षा जास्त जागा मिळाल्याने मुख्यमंत्रिपदावरून संभ्रमाचा वातावरण पाहायला मिळत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाने नितीश कुमार यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे केला होता, पण निकालानंतर चित्र बदललं आहे. भाजपाला निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपा शब्द पाळणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बिहार भाजपा प्रदेशाध्यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असं जाहीर केले आहे. दरम्यान बिहार निवडणुकीत मिळालेल्या जोरदार यशामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसला जोर मिळणार अशी चर्चा सुरु होती, यावर बिहारच्या निवडणुकीच्या निकालांवर काही बोलणार नाही, ऑपरेशन लोटसप्रमाणे ऑपरेशन धनुष्यबाणही होऊ शकतं, कोणी कोणाला रोखू शकत नाही, त्यामुळे कोणी ऑपरेशन करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असा दावा शिवसेना मंत्री अनिल परब यांनी केला आहे.
महाराष्ट्रासारखी बिहारात परिस्थिती निर्माण होऊ शकते असं राजकीय विश्लेषक निवडणुकीपूर्वी सांगत होते, परंतु निकालात जेडीयूला मिळालेल्या जागांमुळे चित्र बदललं आहे. जेडीयूला जास्त जागा मिळाल्या असत्या तर नितीश कुमार काँग्रेस-आरजेडीसोबत जाऊ शकतात असं म्हटलं जात होतं, मात्र मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असणाऱ्या जेडीयूला बिहार निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागत आहे. बिहारमध्ये भाजपा ७७ त्यानंतर राजद ६९ जागांवर आघाडी असल्याचं दिसून येत आहे.
बिहार निवडणुकीत शिवसेनेची तुतारी वाजलीच नाही; सर्व २२ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान
शिवसेना उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान
या निवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी एनडीएविरोधात आक्रमक पवित्रा घेत उमेदवार उभे केले होते, पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना ५० जागांवर लढणार असल्याचं जाहीर केले. परंतु शिवसेनेने २२ जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व २२ जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला जेडीयूने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर निवडणुका लढवता येणार नाही असा आदेश दिला, त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट चिन्ह दिले, पण नापसंत पडल्याने शिवसेनेने दुसरं चिन्ह देण्याची मागणी केली, शिवसेनेची विनंती मान्य करत निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारं चिन्ह शिवसेनेला दिलं होतं. दुपारी ३ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मतदान झाल्याचं दिसून आलं.